मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू होणार

अध्यासन केंद्रामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा प्रसार व प्रचार करणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर संशोधन व अभ्यास करणे आदी उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे.

मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू होणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या विचारांचा जागर सर्व मनामनात व्हावा तसेच महाराजांचे विचार, त्यांच्याबद्दलची माहिती पोहोचावी, या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरु करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. अध्यासनाच्या स्थापनेसाठी सरकारकडून तीन कोटी रुपयांच्या निधीलाही मंजूरी देण्यात आली आहे.

 

उच्च व तंत्र शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय काढला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर सर्व मनामनात व्हावा, यासाठी अध्यासन केंद्र स्थापन केले जाणार आहे.

MPSC चा कारभार पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हाती

 

अध्यासन केंद्रामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा प्रसार व प्रचार करणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर संशोधन व अभ्यास करणे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यासंबंधी साहित्य कृतीची निर्मिती करणे हे उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे.

 

अध्यासन केंद्राला मान्यता मिळाली असली तरी कोणतेही नविन पद तयार करता येणार नाही. या केंद्राकरिता लागणारे मनुष्यबळ विद्यापीठाच्या आकृतीबंधातून उपलब्ध करुन द्यावे लागणार आहे. अध्यासनाच्या स्थापनेसाठी ठोक रक्कम तीन कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

 

शासनाकडून उपलब्ध होणारे अनुदान राष्ट्रीयकृत बँकेच्या नियतठेवीत गुंतवण्यात येईल आणि या रक्कमेतून प्राप्त होणारी व्याजाची रक्कम अध्यासनाच्या कामकाजासाठी उपयोगात आणली जाईल. विद्यापीठास कोणताही अधिकचा निधी उपलब्ध करुन दिला जाणार नाही. विद्यापीठास लागणारा अधिकचा निधी विद्यापीठाने स्वनिधीतून उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k