पर्यावरण दूत म्हणून विद्यार्थी करू शकतात प्रभावी काम!

प्रगती, आर्थिक सुबत्ता, राहणीमानातील बदल, शहरीकरण व औद्योगिकीकरण यामुळे संसाधनाचा वापर व प्रदूषणात वाढ झाली आहे.

पर्यावरण दूत म्हणून विद्यार्थी करू शकतात प्रभावी काम!
Rajendrakumar Saraf

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

आजच्या समाजात पर्यावरण विषयक जागृती करण्यासाठी शालेय विद्यार्थी पर्यावरण दूत (Environmental Ambassador) म्हणून प्रभावी काम करु शकतात. शालेय (School) जीवनातच मुलांमध्ये (Students) पर्यावरण विषयक सजगता निर्माण झाल्यास  हीच मुले मोठी झाल्यावर पर्यावरण संवर्धनाचे काम प्रामाणिकपणे करतील, असा विश्वास पर्यावरण अभ्यासक राजेंद्रकुमार सराफ (RajendraKumar Saraf) यांनी व्यक्त केला.

रोटरी क्लब ऑफ बारामती आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ यांच्या वतीने सोमेश्वरनगर येथे आयोजित पर्यावरण संवर्धन कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ बारामतीचे अध्यक्ष डॉ. अजय दरेकर, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या पर्यावरण समितीच्या डायरेक्टर गौरी शिकारपुर, विद्या प्रतिष्ठानच्या सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक सचिन पाठक, दर्शना गुजर, अरविंद गरगटे, रोटरी क्लब ऑफ ई डायमंडचे अध्यक्ष प्रकाश सुतार, रोट्रॅक्ट क्लब ऑफ बारामती चे अध्यक्ष आदित्य भावसार आदी उपस्थित होते.

हेही वाचा : शिक्षक पदभरती, संचमान्यतेचे वेळापत्रक ठरले; शाळांकडे उरले फक्त आठ दिवस

आपले म्हणजे मानवाचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर आपण पर्यावरणाची काळजी घ्यायला हवी आहे. आज आपण पर्यावरणाची काळजी घेतली नाही तर उद्याच्या पिढीचे भवितव्य धोक्यात येईल. म्हणून उद्याच्या पिढीचे प्रतिनिधी असलेल्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण दूत म्हणून प्रभावी काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सराफ यांनी केले. सराफ यांनी यावेळी ३०० विद्यार्थ्यांना पर्यावरणीय कारभारी / दूत कसे व्हायचे, यावर मार्गदर्शन केले.

प्रगती, आर्थिक सुबत्ता, राहणीमानातील बदल, शहरीकरण व औद्योगिकीकरण यामुळे संसाधनाचा वापर व प्रदूषणात वाढ झाली आहे. त्याचे विपरीत परिणाम दिसत आहेत. सामाजिक आणि पर्यावरणीय बदल व संदर्भ वापरून सामाजिक व पर्यावरणीय बदल घडवून आणता येतील. याची अनेक उदाहरणे देत सराफ यांनी हे समजावून सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरणीय दूत होऊ असा संकल्प सोडला.

हेही वाचा : आगीत होरपळणाऱ्या मणिपूरमध्ये अडकले महाराष्ट्रातील २२ विद्यार्थी; शिंदे सरकार लागले कामाला

डॉ. अजय दरेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘’रोटरी क्लब कायमच समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कामे करत असतात. पर्यावरण संवर्धन जागृती हे रोटरीचे जगभर चालणारे प्रभावी काम आहे. अशा कार्यशाळांमधून पर्यावरणाबाबत संवेदनशील विद्यार्थी निर्माण करण्याचा वसा रोटरी क्लब ऑफ बारामतीने घेतला आहे.’’ कार्यशाळेच्या आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ बारामती, रोटरी क्लब ऑफ दौंड, रोटरी क्लब ऑफ ई डायमंड, रोटरी क्लब ऑफ पुणे गणेशखिंड, रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांनी सहकार्य केले.