शिक्षण, नैतिकतेचा वापर समाजासाठी करतो ; तोच खरा शहाणा माणूस : डॉ. विजय खरे

माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी १३४ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. या विद्यार्थ्यांना बुद्ध जयंती निमित्ताने  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. खरे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी धनादेशाचे वाटप करण्यात आले.

शिक्षण, नैतिकतेचा वापर समाजासाठी करतो ; तोच खरा शहाणा माणूस : डॉ.  विजय खरे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

समाजात वावरताना एक विचार घेऊन पुढे गेले पाहिजे. चळवळ चालवली पाहिजे. आपण सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहोत. बाबासाहेबांच्या विचारानुसार ज्यांच्याकडे शिक्षण, नैतिकता आहे. त्याचा वापर जो समाजासाठी करेल तोच खरा शहाणा माणूस असतो, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Savitribai Phule Pune University) कुलसचिव डॉ. विजय खरे (Dr. Vijay Khare) यांनी केले.

बुद्ध जयंतीनिमित्त (Buddha Jayanti) आयोजित गौतम बुद्ध जन्मसोहळा या कार्यक्रमात खरे बोलत होते.पुणे यावेळी महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी १३४ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. खरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. यश फाऊंडेशन व डॉ. सिद्धार्थ धेंडे मित्र परिवाराच्या वतीने लुंबिनी उद्यान येथे हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगीआरपीआयचे संजय सोनवणे, भाजपा प्रवक्ते मंगेश गोळे यांच्यासह आदी मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार चालताना आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो ही मनात भावना आहे. त्यामधूनच जयंतीनिमित्त अनावश्यक खर्च न करता विद्यार्थ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा १३४ वी जयंती सर्वांनी उत्साहात साजरी केली. त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या १३४ विद्यार्थी दत्तक घेतले. त्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी हातभार लावण्याच्या उद्देशाने धनादेशाचे वाटप केले. 

मंगेश गोळे म्हणाले , विद्यार्थ्यांना मदत करून बाबासाहेब आणि बुद्धांना वंदन करण्याचा खरा कार्यक्रम ठरला. डॉ. धेंडे हे संवेदनशील नेतृत्व प्रभागाला मिळाले. आपल्या पदाचा उपयोग समाजातल्या तळागाळातील लोकांपर्यंत पोचविण्याचे काम डॉ. धेंडे यांनी केले.  

संजय सोनवणे म्हणाले,  विद्यार्थ्यांना मदत करून एक आगळा वेगळा उपक्रम प्रभागात राबविला आहे . विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. सामाजिक चळवळीत काम करताना जयंतीनिमित्त चांगला उपक्रम ठेवण्याचे भान डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी जोपासले. 

या वेळी त्रिरत्न कलाकार संघातील कलाकारांनी महामानवाची यशोगाथा हा संगीतमय कार्यक्रम सादर केला. भन्ते नागघोष व सहकारी भन्ते यांच्या उपस्थितीत सर्व धर्मातील 25 जोडप्यांच्या (पती-पत्नी) हस्ते तथागत गौतम बुद्ध जन्म सोहळा पार पडला.