फटाकेमुक्त दिवाळीसाठी राज्य सरकार आग्रही; विद्यार्थ्यांना दिली शपथ, जागृतीचे आवाहन

वाढती प्रदूषण पातळी रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. पर्यावरणपूरक भूमिका घेऊन प्रदूषण वाढणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले. 

फटाकेमुक्त दिवाळीसाठी राज्य सरकार आग्रही; विद्यार्थ्यांना दिली शपथ, जागृतीचे आवाहन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी राज्य सरकार फटाकेमुक्त दिवाळी (Crackers free Diwali) साजरी करण्यासाठी आग्रही असल्याचे दिसते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बुधवारी विद्यार्थ्यांना प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली. तर दुसरीकडे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar) यांनीही यावर्षीची दिवाळी फटाकेमुक्त आणि दिवे लावून साजरी करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

 

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे ‘प्रदूषणमुक्त दीपावली संकल्प अभियान – २०२३’ अंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, अल्पसंख्यांक व पणन मंत्री अब्दुल सत्तार आदी उपस्थित होते.

EDUVARTA IMPACT : प्राध्यापक पदाचा अर्ज ऑनलाईन केला उपलब्ध; उमेदवारांना दिलासा

 

प्रदूषणमुक्त महाराष्ट्र व्हावा, यासाठी सर्वांचे प्रयत्न अपेक्षित आहेत. वाढती प्रदूषण पातळी रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. पर्यावरणपूरक भूमिका घेऊन प्रदूषण वाढणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले. शालेय विद्यार्थ्यांनी एखादी गोष्ट मनावर घेतली की त्या कुटुंबात पालकही त्याचे अनुकरण करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला, तर तो निश्चितपणे सर्वांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

 

दीपक केसरकर यांनी तर दिवाळी फटाकेमुक्त साजरी करण्याबाबत वक्तव्य केले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांबाबत विद्यार्थ्यांना माहिती देणे गरजेचे आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी यावर्षीची दिवाळी फटाकेमुक्त आणि दिवे लावून साजरी करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना केले.

 

केसरकर यांनी मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील सर्व मुख्याध्यापक व प्राचार्यांशी दीपावलीमध्ये फटाके न फोडण्याच्या अनुषंगाने जागृती करण्याबाबत बुधवारी संवाद साधला. 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO