ही ZP शाळा आहे की संगणक प्रयोगशाळा; विद्यार्थी गिरवतात कोडिंगचे धडे
नांदे येथील जिल्हा परिषद शाळेला राज्य सरकारकडून आदर्श शाळा म्हणून यापुर्वीच गौरविण्यात आले आहे. त्याप्रमाणे ही शाळा इतर शाळांना हेवा वाटेल, असे काम करून आदर्श निर्माण करत आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
जिल्हा परिषदेची शाळा (ZP School) म्हटली की शिक्षणाचा (Education) कमी दर्जा, असुविधा, नाविण्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अभाव असे चित्र अजूनही अनेकांच्या डोळ्यासमोर उभे राहते. पण मागील काही वर्षांत पुणे जिल्ह्यासह (Pune District) राज्यभरातील अनेक शाळांचा कायापालट झाला आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी (Mulshi) तालुक्यातील नांदे गावातील शाळा (ZP School Nande) त्यापैकीच एक. ही शाळा जणू संगणकीय प्रयोगशाळाच (Computer Lab) बनली असून विद्यार्थी थेट कोडिंगचे धडे गिरवत असून सॉफ्टवेअरमधील बड्या कंपन्यांतील अधिकाऱ्यांसमोर आत्मविश्वासाने सादरीकरणही करत आहेत.
नांदे येथील जिल्हा परिषद शाळेला राज्य सरकारकडून आदर्श शाळा म्हणून यापुर्वीच गौरविण्यात आले आहे. त्याप्रमाणे ही शाळा इतर शाळांना हेवा वाटेल, असे काम करून आदर्श निर्माण करत आहे. मुख्याध्यापिका वृषाली भंडारी (Vrushali Bhandari) यांनी शाळेमध्ये सुरू असलेल्या विविध नाविण्यपुर्ण उपक्रमांची माहिती ‘एज्युवार्ता’शी बोलताना दिली.
RTE 2023 : प्रवेशासाठी आता शेवटची संधी; १५ मेनंतर मुदतवाढ नाही
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख, अभुभवाधा!रित शिक्षण देण्यावर भर द्यायचा आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेकडूनही शाळांमध्ये ‘सृजन’सारखे उपक्रम राबविले जात आहेत. त्याअनुषंगाने नांदे येथील शाळेमध्ये कोटक एज्युकेशन फाउंडेशन यांचेमार्फत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी विविध शैक्षणिक साहित्य देण्यात आले आहे.
शाळेला ३० टॅबलेट, १ स्मार्ट टीव्ही, २ अँड्रॉइड टीव्ही देण्यात आले आहेत. प्रत्येक बेंचवर एक टॅबलेट बसविण्यात आलेला आहे. तसेच इंग्लिश स्पोकन इंग्लिश चे क्लास घेण्यासाठी पूर्ण वेळ शिक्षक देखील नेमलेले आहेत. त्याचप्रमाणे पायजाम फाउंडेशन, लीडरशीप फॉर इक्विटी व अमेझॉन फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने ८ मिनी सी.पी.यु प्राप्त झाले आहेत. इयत्ता ६ वी ते ८ वी तील विद्यार्थ्यांसाठी संगणकीय कोडींगचे शिक्षण देण्यासाठी आठवड्यातून २ दिवस शिक्षक येतात, असे भंडारी यांनी सांगितले.
धक्कादायक : दहावी, बारावी पासची प्रमाणपत्रे मिळतात ३५ ते ५० हजारांत
दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी संगणक प्रणालीचा वापर कसा करावा, याचे घेत आहेत. विद्यार्थ्यांनी नुकतेच हवामान स्थानक सारखे उपक्रम तयार करून त्यांचे सादरीकरण कॅप जेमिनी सारख्या सॉफ्टवेअर कंपनीतील अधिकाऱ्यांसमोर मोठ्या आत्मविश्वासाने केले, अशी माहिती भंडारी यांनी दिली. शाळेत सुरू असलेल्या विविध उपक्रमांसाठी तत्कालीन बीईओ माणिक बांगर, बीईओ गोरक्षनाथ हिंगणे, विस्तार अधिकारी किसन भुजबळ, केंद्रप्रमुख त्रिंबक ताम्हाणे, सोपान ठकोरे यांनी मार्गदर्शन केले.
कोडिंग म्हणजे काय?
संगणक वापरताना केवळ बाहेरून सुरू असलेली प्रक्रिया आपल्याला दिसत असते. ही प्रक्रिया घडण्यासाठी केलेली रचना म्हणजे कोडिंग. ही रचना आपल्याला बाहेरून दिसत नाही. कोडिंगला प्रोग्रामिंग किंवा संगणकीय भाषा असेही म्हटले जाते. संगणकावर आपण जे काही करतो, ते कोडिंगमुळे होते. कोडिंगचा वापर करून संकेतस्थळ, गेम, अॅप तयार करता येऊ शकतात. त्याचप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स सारख्या गोष्टीही करता येतात.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
eduvarta@gmail.com