कुलसचिव गहिवरले, कर्मचारी संघटनेचा सिनेटमध्ये गोंधळ  

अत्यंत कमी मनुष्य बळावर  विद्यापीठाला काम करावे लागते,असे असताना तुमच्या सारखे जबाबदार व्यक्ती विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबत, असे वक्तव्य करता, यामूळे मी व्यथित झालो आहे.

कुलसचिव गहिवरले, कर्मचारी संघटनेचा सिनेटमध्ये गोंधळ  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची (Savitribai Phule Pune University)अधिसभा (CNET) सलग दुसऱ्या दिवशी वादळी ठरली. विद्यापीठाच्या एका अधिसभा सदस्याने (CNET Member) विद्यापीठ प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर व कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीवर कडक शब्दात टीका केली.त्यावर उत्तर देताना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार (Registrar Dr. Prafull Pawar) यांना गहिवरून आले. ही बाब कर्मचारी व अधिकारी यांना समजताच त्यांनी मोर्चा काढत  विद्यापीठाच्या अधिसभेत घुसून गोंधळ घातला. संबंधित अधिसभा सदस्यांचे पद रद्द करण्याची मागणी केली.त्यामुळे काही काळ विद्यापीठात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा: विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे ठराव संकेतस्थळावर टाकणार

विद्यापीठात विविध कामासाठी आल्यानंतर विद्यापीठातील अधिकारी व  कर्मचाऱ्यांकडून प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी एवढेच नाही तर आधिसभा व व्यवस्थापन परिषद सदस्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते.विद्यापीठात आल्यानंतर त्यांची कामे होत नाहीत.त्यांना तासंतास विद्यापीठात बसून ठेवले जाते.त्यांचा वाईट पद्धतीने अपमान केला जातो.त्यामुळे अशा कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी , प्रस्ताव एका सदस्याने अधिसभेत ठेवला.त्यावर बराच वेळा चर्चा झाली.मात्र, या घटनेला वेगळेच वळण मिळाले.

कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार अधिसभा सदस्यांना उत्तर देताना म्हणाले, विद्यापीठ प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेतला आहे.हा विद्यापीठाच्या प्रतिष्ठेचा  विषय आहे.आधिसभा सदस्यांना कटू अनुभव आले होते.त्यांची या प्रकरणी लेखी स्वरूपातील तक्रार घेण्यात आली.तसेच संबंधित कर्मचाऱ्यांच्या विरोधातील कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.मात्र,विद्यापीठात २००९ च्या आकृतीबंधानुसार कर्मचारी आहेत.अनेक कर्मचारी निवृत्त झाले आहेत.त्यामुळे अत्यंत कमी मनुष्य बळावर  विद्यापीठाला काम करावे लागते,असे असताना तुमच्या सारखे जबाबदार व्यक्ती विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबत, असे वक्तव्य करता, यामूळे मी व्यथित झालो आहे. विद्यापीठातील कर्मचारी अनेक महिने सुट्टी न घेता काम करतात..., असे म्हणत प्रफुल्ल पवार गहिवारून गेले व त्यांचे डोळे पाणावले. त्यावर सभागृह काही कालावधीसाठी स्तब्ध झाले. विद्यापीठातील अधिकारी व इतर सदस्यांनी संबंधित प्रस्ताव माग घेण्यास सांगितले. तसेच संबंधित अधिसभा सदस्यांनी सुध्दा दिलगिरी व्यक्त केली.

विद्यापीठाच्या अधिसभेत घडलेला प्रकार विद्यापीठ परिसरात वाऱ्यासारखा पसरला. त्यावर विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येत संबंधित आधिसभा सदस्या विरोधात घोषणा दिल्या. तुम्ही पाच वर्षासाठी विद्यापीठात निवडून येता,आम्ही ३० ते ३५ वर्षे विद्यापीठासाठी काम करतो.आम्हाला शिवू नका, कुलसचिव हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत.ते व्यथित झाले आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर आरोप करणाऱ्या अधिसभा सदस्यांला निलंबित करा.त्याचे पद रद्द करा,अशी मागणी करता कामगार एकजुटीचा विजय असो.. अशा घोषणा देत सुरू असलेल्या सिनेट मध्ये प्रवेश केला. कुलसचिव व इतर सदस्यांनी मध्यस्थी करून मोर्चा घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. त्यानंतर पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरू झाले.