देशभक्तिने भारावलेल्या वातावरणात ‘अमृत कलश‌’ कर्तव्य पथाकडे

शहीदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संकलित केलेल्या मातीचे अमृत कलश देशभक्तिने भारावलेल्या वातावरणात रविवारी पुणे रेल्वे स्थानकावरून नवी दिल्लीतील कर्तव्य पथावरील स्मारकासाठी रवाना करण्यात आले.

देशभक्तिने भारावलेल्या वातावरणात ‘अमृत कलश‌’ कर्तव्य पथाकडे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत राज्यातील शहीदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संकलित केलेल्या मातीचे अमृत कलश देशभक्तिने भारावलेल्या वातावरणात रविवारी पुणे रेल्वे स्थानकावरून नवी दिल्लीतील कर्तव्य पथावरील स्मारकासाठी रवाना करण्यात आले. रांगोळी, सनई-चौघड्याचे सूर, ढोल-ताशांचा गजर, ठिकठिकाणी उभारलेले राष्ट्रध्वज, भारतमातेचा जयघोष करणारी सळसळत्या उत्साहातील तरुणाईने परिसरातील वातावरण राष्ट्रभक्तीने भारावून गेले होते. राष्ट्रीय सेवा योजनेतील (एनएसएस) 1400 विद्यार्थ्यांनी अमृत कलश घेऊन दिल्लीकडे प्रस्थान केले.

हेही वाचा : कुलसचिव गहिवरले, कर्मचारी संघटनेचा सिनेटमध्ये गोंधळ

राज्याचे उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, एनएसएसच्या राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, आमदार सुनील कांबळे, भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ आणि शहीद प्रदीप ताथवडे व शहीद दिलीप ओझरकर यांच्या नातेवाईकांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी आणि मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी ज्या सैनिकांनी प्राणांची आहुती दिली त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर अमृतवाटीका उभारण्यात येत आहे. तरुण पीढीला पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य टिकविण्यासाठीचा संघर्ष  माहीत व्हावा यासाठी या अमृतवाटीकेसाठी एक मूठभर माती पाठविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 31 ऑक्टोबरला होणार आहे. ही पीढी आयुष्यभर या प्रसंगाची आठवण ठेवेल. जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात तरूणाई बाहेर पडते, तेव्हा देशाचे भवितव्य उज्ज्वल असल्याचा विश्वास मिळतो.