‘नॅक’बाबत मंत्री चंद्रकांत पाटील थेट मंत्रालयात घेणार विद्यापीठांची ‘हजेरी’

विद्यापीठांकडून अहवाल सादर करण्यात न आल्याने विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. सर्व विद्यापीठांचे कुलगुरू व कुलसचिवांकडून केलेल्या कार्यवाहीचा आढावा उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडून घेतला जाणार आहे.

‘नॅक’बाबत मंत्री चंद्रकांत पाटील थेट मंत्रालयात घेणार विद्यापीठांची  ‘हजेरी’

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या प्रथम वर्ष प्रवेशाच्या प्रारंभ दिनांकापर्यंत नॅक (NAAC) मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन करण्याच्या सुचना देऊनही अनेक महाविद्यालयांचे मुल्यांकन अजूनही झालेले नाही. संबंधित महाविद्यालयांबाबत संलग्नता काढून घेण्यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल उच्च शिक्षण विभागाने (Higher Education Department) सर्व विद्यापीठांकडून मागविला होता. पण अजूनही विद्यापीठांकडून अहवाल सादर करण्यात न आल्याने विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. सर्व विद्यापीठांचे कुलगुरू (Vice Chancellor) व कुलसचिवांकडून केलेल्या कार्यवाहीचा आढावा उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडून घेतला जाणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह (SPPU) मुंबई विद्यापीठ (Mumbai University), जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ या चार विद्यापीठांचे कुलगुरू व कुलसचिवांना दि. १३ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला दि. १२ सप्टेंबर रोजीची वेळ देण्यात आली आहे.

SPPU NEWS : विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात पद भरती ; सहा महिन्यात रिक्त पदे भरण्याच्या सूचना

गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला आज (दि. ८ सप्टेंबर) दुपारी दोन वाजता पुण्यातील शिवाजीनगरमधील महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीच्या कार्यालयात बोलविण्यात आले आहे. उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी याबाबत सर्व विद्यापीठांचे कुलगुरू व कुलसचिवांना पत्र पाठवून आढावा बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

डॉ. देवळाणकर यांनी पत्रात म्हटले आहे की, राज्यातील सर्व विद्यापीठांनी नॅक मुल्यांकन किंवा पुनर्मुल्यांकन व मानांकनाबाबत एकदाही नॅक मुल्यांकन व मानांकन न झालेल्या अशासकीय अनुदानित महाविद्यालये व सद्यस्थितीत नॅक मुल्यांकन इनअक्टीव्ह असलेल्या शासकीय अनुदानित व विनानुदानित महाविद्यालयांची संलग्नता काढून घेण्यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे कळविले होते. पण विद्यापीठांकडून अद्यापही माहिती व संलग्नता काढून घेतलेल्या महाविद्यालयांची यादी मिळालेली नाही. ही बाब गंभीर असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्ष मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व प्रधान सचिवांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठनिहाय कुलगुरू व कुलसचिव यांनी केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीस कुलगुरू व कुलसचिवांनी एकदाही नॅक मुल्यांकन न झालेल्या महाविद्यालयांची व संलग्नता काढून घेतलेल्या महाविद्यालयांची यादी व केलेली कार्यवाही संबंधित इतर आवश्यक माहितीसह स्वत: उपस्थित राहावे, असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j