प्राध्यापक भरती गैरव्यवहार : एक महिन्यांपासून विद्यापीठ करतय काय ! चौकशी केव्हा होणार ?

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेत झालेल्या प्राध्यापक भरतीची सखोल चौकशी करावी, या मागणीचे निवेदन संस्थेच्या १० पदाधिकाऱ्यांनी उच्च शिक्षण संचालक व विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे दिले आहे.

प्राध्यापक भरती गैरव्यवहार :  एक महिन्यांपासून विद्यापीठ करतय काय !  चौकशी  केव्हा होणार ?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज (Ahmadnagar District Maratha Vidya Prasarak Samaj) या नामांकित शैक्षणिक संस्थेत नियमांचे उल्लंघन करून प्राध्यापक भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. निवड समिती सदस्यांनी मुलाखती दरम्यान पेन ऐवजी पेन्सिलने उमेदवारांना गुण दिले आहेत . तसेच मुलाखती संपल्यानंतर समितीच्या सदस्यांनी आपल्या रिपोर्टवर नियोजित वेळेत स्वाक्षऱ्या केल्या नाहीत, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, या मागणीचे निवेदन संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व विश्वास्तांनी १० जुलै रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) कुलगुरूंना दिले आहे. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठ प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.

प्राध्यापक भरती गैरव्यवहारावर अध्यक्ष नंदकुमार झावरे यांचा प्रथमच खुलासा ; अविश्वासदर्शक ठराव आणताच येत नाही

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या अहमदनगर जिल्हा विद्या प्रसारक  समाज या संस्थेत ७, ८, व ९ जुलै रोजी विविध उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने झाली. तसेच त्यात कोणतीही अनियमितता झाली नाही, असे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे यांनी 'एज्युवार्ता'शी संवाद साधताना सांगितले.मात्र, संस्थेच्या १० पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, या मागणीचे निवेदन उच्च शिक्षण संचालक व पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे दिले आहे. निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सहसचिव विश्वासराव आठरे, खजिनदार डॉ. विवेक भापकर, विश्वस्त मुकेश मुळे, जयंत वाघ, सिताराम खिलारी, दीपलक्ष्मी म्हसे , कार्यकारी मंडळ सदस्य माणिकराव मोरे, दीपक दरे, शंतनु हापसे यांचा समावेश आहे.

प्राध्यापक भरतीत अनियमितता झाल्याचा आरोप केला जात असला तरी त्या संदर्भातील सबळ पुरावे अद्याप समोर आले नाहीत. परंतु, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात अत्यंत गंभीर आरोप आहेत. त्यामुळे संबंधित प्रकरणाची विद्यापीठाकडून चौकशी केली जाणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचप्रमाणे १० जुलै रोजी निवेदन दिल्यानंतर विद्यापीठाने त्यावर काय केले ? असाही प्रश्न अनुत्तरीत आहे.

निवड समितीच्या सदस्यांनी स्वाक्षरीचा रिपोर्ट त्याच दिवशी संस्था व विद्यापीठाकडे सादर केला नाही.  त्यामुळे त्यात फेरफार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  या प्रकरणाची सखल चौकशी केल्यास अनेक गोष्टी उघडकीस येतील. त्यामुळे न्याय हिताच्या दृष्टीने या प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत निवड समितीच्या अहवालाला स्थगिती द्यावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
----------------
"अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या प्राध्यापक भरती प्रक्रियेमध्ये अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या असून त्याची चौकशी करावी. या मागणीचे निवेदन विद्यापीठाच्या कुलगुरूंना देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठाने या संदर्भातील चौकशी समिती नेमणूक लवकरात लवकर निर्णय घ्यावा." 
- शंतनु हापसे, कार्यकारी मंडळ सदस्य, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज