आता लढा १०/२०/३० साठी;  शिवाजी खांडेकरांनी शिक्षणमंत्र्यांना करून दिली आठवण

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे बक्षी समितीने खंड एक मध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मंजूर केलेल्या १०/२०/३० च्या लाभाची योजना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करावी, अशी संघटनांनी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.

आता लढा १०/२०/३० साठी;  शिवाजी खांडेकरांनी शिक्षणमंत्र्यांना करून दिली आठवण
Education Minister Deepak Kesarkar and Shivaji Khandekar

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सातत्याने आंदोलन केले आहे. त्यानंतरच त्यांची एक-एक मागणी पूर्ण होत आली आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने (State Government) अर्धवेळ ग्रंथपालांचे (Librarian) पूर्णवेळ पदावर रुपांतरण करण्याचा निर्णय घेत त्यांना दिलासा दिला. आता १०/२०/३० च्या लाभाची योजना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना (Non Teaching Staff) लागू करण्यासाठी पुढचा लढा सुरू राहणार असल्याचे सुतोवाच संघटनांनी केले आहे.

संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे समन्वयक शिवाजी खांडेकर (Shivaji Khandekar) यांनी बुधवारी मुंबईत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ पदावर उन्नयन केल्याबद्दल केसरकरांचे आभार मानले. मात्र, या भेटीत खांडेकर यांनी शिक्षणमंत्र्यांना १०/२०/३० बाबत आठवणही करून दिली.

हेही वाचा : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : अकरावी प्रवेशाबाबत मोठी अपडेट

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे बक्षी समितीने खंड एक मध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मंजूर केलेल्या १०/२०/३० च्या लाभाची योजना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करावी, अशी संघटनांनी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्याचप्रमाणे शिक्षकेतर आकृतीबांधाबाबत नियुक्त केलेल्या समितीने सादर केलेला अहवाल जशाच्या तसा मंजूर करून चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरतीसह सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती त्वरित परवानगी द्यावी, माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, राज्यातील शिक्षकेतरांच्या शिक्षण सेवक मानधनाद्वारे वाढ करावी, शिक्षकेतरांच्या अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांना तात्काळ मान्यता द्यावी, महाराष्ट्र विधान परिषदेतील शिक्षक आमदारांना मतदान करण्याचा अधिकार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळावा, या मागण्यांसाठीही आंदोलने करण्यात आली आहेत.

दरम्यान, सद्यस्थितीत कार्यरत १२७६ अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपालपदी रुपांतरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Government) घेतला आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश शिक्षण विभागाला (Education Department) देण्यात आले आहे. ही कार्यवाही टप्याटप्याने केली जाणार आहे. अर्धवेळ ग्रंथपालांचे रुपांतरण पूर्ण होऊपर्यंत पूर्णवेळ ग्रंथपालांची नव्याने भरती होणार नसल्याचे सरकारने म्हटले आहे. (School Librarians News)

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

राज्यामध्ये पूर्णवेळ ग्रंथपालांची एकूण २ हजार ११८ मंजूर पदे आहेत. सद्यस्थितीत कार्यरत पदे साधारणपणे ९२६ असून, अर्धवेळ ग्रंथपालांच्या रुपांतरण करण्यासाठी साधारणपणे १ हजार १९२ पदे उपलब्ध आहेत. राज्यातील सर्व अर्धवेळ ग्रंथपालांचे उपलब्ध असलेल्या पूर्णवेळ ग्रंथपालपदी रुपांतरण केले जाणार आहे. राज्यामध्ये सध्या २ हजार ते ३ हजार इतकी विद्यार्थी संख्या असलेल्या सर्वसाधारण शाळा २८० असुन त्यावर अधिक २८०च पूर्णवेळ ग्रंथपालाना कार्यभार असेल. तसेच ३ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या ५३ शाळा आहेत. त्यामध्ये १०६ पूर्णवेळ ग्रंथपालांची नियुक्ती होईल. अशा पद्धतीने एकुण ३८६ पूर्णवेळ ग्रंथपालांची नियुक्ती केली जाईल. शिवाजी खांडेकर यांनी अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ म्हणून नियुक्ती मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.