राज्य सरकारची नजर आता आश्रमशाळांवर; २५० शाळांना ‘आदर्श’ करणार

आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल, नामांकीत शाळा योजना अंतर्गत इ. १ ली ते इ. १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो.

राज्य सरकारची नजर आता आश्रमशाळांवर; २५० शाळांना ‘आदर्श’ करणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

राज्यातील महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी या शाळा दत्तक (School Adoption Scheme) देण्यात येणार आहेत. खासगी कंपन्या, दानशून व्यक्ती किंवा सामाजिक संस्थांकडून विविध वस्तू स्वरुपात मदत घेऊन या शाळा सक्षम करण्याचा दावा राज्य सरकारने (Maharashtra Government) केला आहे. आता राज्यातील २५० आश्रमशाळाही ‘आदर्श’ करण्यात येणार आहेत. या शाळांमध्ये उच्च दर्जाच्या भौतिक सुविधांसह शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पण त्याबाबतची कार्यपध्दती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. (Tribal Devlopment Department)

 

आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल, नामांकीत शाळा योजना अंतर्गत इ. १ ली ते इ. १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. राज्यात सध्या एकूण ४९७ शासकीय आश्रमशाळा कार्यरत आहेत. आधुनिक काळातील बदलत्या आव्हानाचा सामना करण्यासाठी या शाळांमध्ये आमूलाग्र बदल करणे आवश्यक असून शिक्षणातून विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकास होणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने २५० आदर्श आश्रमशाळा तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या शाळांची यादीही तयार करण्यात आली आहे. त्यांना आदर्श आश्रमशाळा म्हणून घोषित करण्यात आले आहे.

शिक्षक माघार घेईनात! साक्षरता अभियानावरील बहिष्कार कायम, तोडगा नाहीच

 

घोषित करण्यात आलेल्या आश्रमशाळा आदर्श आश्रमशाळा म्हणून विकसित करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक आदर्श आश्रमशाळेत विविध भौतिक सुविधा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एक सुसज्य शालेय इमारत, ICT लॅब, सायन्स लॅब, ग्रंथालय, संगीत व कला कक्ष तसेच पुरेशे शौचालये, निवासी मुले व मुलींकरीता स्वतंत्र व सुसज्ज वसतिगृहाची इमारत, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था (staff quarters), सुसज्ज भोजनालय व बहुउद्देशीय सभागृह, अपंग विद्यार्थ्यांसाठी पुरेशा सोयी-सुविधांसह स्वतंत्र शौचालय, स्वच्छ व पुरेशा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अशा सुविधा प्रस्तावित आहेत.

 

त्याचप्रमाणे सुस्थितीत असलेले वर्ग, आकर्षक इमारत, क्रीडांगण व त्याकरिता पुरेसे क्रीडा साहित्य, सोलर इन्व्हेंटर, कपडे धुणे व सुकविण्यासाठी पुरेशी जागा, संरक्षण भिंत आणि पुरेसे CCTV कॅमेरे, अद्यायावत शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी डिजिटल क्लासरूम, व्हर्च्यूअल क्लासरुम, टॅब लॅब, कॉम्प्युटर लॅब इत्यादी सुविधांचा समावेश असेल. भौतिक सुविधांप्रमाणेच शैक्षणिक सुविधाही असतील.

आता मृत्यूपेक्षा सुंदर काहीच नाही! नोकरीवरून काढलेल्या प्राध्यापिकेला हवे इच्छामरण

 

आदर्श आश्रमशाळांमधून २१ व्या शतकातील कौशल्ये जसे की, नवनिर्मितीला चालना देणारे (Creative thinking), समिक्षात्मक विचार (Critical Thinking), वैज्ञानिक प्रवृत्ती (Scientific) Temperament) संविधानिक मूल्ये अंगी बाणविणे, सोबत काम करण्याचे कौशल्य (Collaboration), संभाषण कौशल्य (Communication) या सारखी अन्य कौशल्ये जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली जातील. विद्यार्थ्यांची मातृभाषा आणि इंग्रजी या दोहोमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करणे, कृतियुक्त शिक्षण (Activity Based Learning) आदी प्रयत्नही करणे अपेक्षित आहेत.

 

कार्यपध्दती निश्चित करण्यासाठी समिती

आदर्श आश्रमशाळांमध्ये भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने तसेच अभ्यासक्रम आणि कार्यपध्दती निश्चित करण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती आदर्श आश्रमशाळांची शैक्षणिक प्रगती, पायाभूत सोयी-सुविधांचा विकास, अभ्यासक्रमासाठी पूरक उपक्रम या सर्व बाबींवर संनियंत्रण करेल.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j