MBBS च्या शुल्कासाठी विद्यार्थ्याला ठेवले डांबून; अनुसूचित जाती संवर्गातील विद्यार्थ्यांची 'सीईटी सेल'कडे तक्रार

प्रवेशासाठी निश्चित करण्यात आलेले 50 हजार रुपये शुल्क संबंधित विद्यार्थ्याने महाविद्यालयाकडे धनादेशाद्वारे दिले. परंतु, येथील वसतिगृह व मेसच्या शुल्कासाठी 8 लाख 70 हजार रुपये भरावे लागतील,असे महाविद्यालय प्रशासनाने संबंधित विद्यार्थ्यांना सांगितले.

MBBS च्या शुल्कासाठी विद्यार्थ्याला ठेवले डांबून; अनुसूचित जाती संवर्गातील विद्यार्थ्यांची 'सीईटी सेल'कडे तक्रार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात (Private Medical College in Sindhudurg District)एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या (MBBS Course)प्रवेशासाठी आलेल्या एका विद्यार्थ्याला कॉलेज प्रशासनाने पूर्ण शुल्क (full fee)भरण्याच्या नावाखाली डांबून ठेवल्याचे घटना समोर आली आहे. संबंधित विद्यार्थी हा गडचिरोली येथील (Student from Gadchiroli)असून महाविद्यालयातील या प्रकारामुळे त्याला मानसिक धक्का बसला आहे.  त्यामुळे संबंधित विद्यार्थ्याने याबाबत सीईटी सेल,वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे तक्रार दिली आहे. परंतु, या संदर्भातील सर्व आरोप महाविद्यालय प्रशासनाने फेटाळले आहेत.

एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गडचिरोली जिल्ह्यातील आहेरी तालुक्यातील रेपनपल्ली गावातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचा क्रमांक सिंधुदुर्ग येथील एका खाजगी महाविद्यालयात लागला. सीईटी सेलकडून प्रवेशाबाबत विविध फेऱ्या राबविण्यात आल्या. प्रवेश प्रक्रियेतील तिसरी फेरी ४ नोव्हेंबर रोजी संपली. खाजगी वैद्यकीय महाविद्यालय असले तरी राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क हे शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शासनाकडून दिले जाते. त्यामुळे प्रवेशासाठी निश्चित करण्यात आलेले 50 हजार रुपये शुल्क संबंधित विद्यार्थ्याने महाविद्यालयाकडे धनादेशाद्वारे दिले. परंतु, येथील वसतिगृह व मेसच्या शुल्कासाठी 8 लाख 70 हजार रुपये भरावे लागतील,असे महाविद्यालय प्रशासनाने संबंधित विद्यार्थ्यांना सांगितले. मात्र, नियमानुसार होस्टेल व मेसची सुविधा कोणत्याही विद्यार्थ्याला बंधनकारक करता येत नाही. तरीही या विद्यार्थ्याकडे शुल्क भरण्याबाबत आग्रह करण्यात आला.त्याने नकार दिल्यानंतर त्याला डांबून ठेवण्यात आले. तसेच त्याला मोबाईलवरूनही कोणालाही संपर्क साधू दिला नाही.  

संबंधित विद्यार्थ्याकडून "माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकत नाही. कॉलेज प्रशासनाची यामध्ये कोणतीही चूक नाही" अशा आशयाचा ई-मेल सीईटीला सक्तीने पाठविण्याची सक्ती करण्यात आली व संबंधित विद्यार्थ्याला डांबून ठेवण्यात आले. ई - मेल पाठविल्यानंतरच संबंधित महाविद्यालयातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबियांना सोडून दिले. दरम्यान, या प्रकरणामुळे संबंधित विद्यार्थी व त्याच्या कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे, असे असतानाही त्यांनी याबाबत सीईटी सेलकडे तक्रार केली असून पुढील प्रवेश फेरीत इतर महाविद्यालयात प्रवेश मिळावा, अशी मागणी केली आहे.