मराठा आरक्षणामुळे 'ईडब्ल्यूएस'च्या प्रवेशात मोठी घट

राज्य सरकारने काढलेल्या शासननिर्णयामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे असे स्पष्ट करण्यात आले. यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळत नाही. परिणामी, मराठा समाजातील मुलांचा एसईबीसी प्रवर्गातून प्रवेश घेण्याकडे कल वाढला आहे.

मराठा आरक्षणामुळे 'ईडब्ल्यूएस'च्या प्रवेशात मोठी घट

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

एसईबीसी आरक्षणामुळे (SEBC Reservation) ईडब्ल्यूएस प्रवर्गातील प्रवाशांमध्ये मागील तीन वर्षांमध्ये १५ टक्क्यांनी घट झाली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Examination) कक्षाने (सीईटी कक्ष) उच्च व तंत्रशिक्षण विभागाला (Department of Higher and Technical Education) सादर केलेल्या अहवालातून ही बाब उघडकीस आली आहे. दरम्यान, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गातून (एसईबीसी) प्रवेश देण्यात येत असल्याने त्याचा परिणाम आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधील (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातील प्रवेशावर झाला आहे.

'एसईबीसी'कडे कल

राज्य सरकारने काढलेल्या शासननिर्णयामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे असे स्पष्ट करण्यात आले. यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळत नाही. परिणामी, मराठा समाजातील मुलांचा एसईबीसी प्रवर्गातून प्रवेश घेण्याकडे कल वाढला आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, २०२३-२४ मध्ये ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी ११ हजार १८४ जागा होत्या. या जागांवर ७ हजार ३५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. २०२४-२५ मध्ये जागांची संख्या १२ हजार ७०४ झाली, मात्र प्रवेश घेणाऱ्यांची संख्या किंचित कमी झाली. २०२४-२५ मध्ये ७ हजार २७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. २०२५-२६ मध्ये ईडब्ल्यूएस प्रवर्गात १ हजार ६८९ जागा वाढल्याने उपलब्ध जागांची संख्या १४ हजार ३९३ झाली. मात्र प्रवेश घेणाऱ्यांची संख्या ३५ ने घटली. याच वर्षी ७ हजार २४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. ईडब्ल्यूएससाठी उपलब्ध जागांची संख्या वाढल्याने प्रवेशाची टक्केवारी ६५.७४ वरून ५०.३१ टक्क्यांवर घसरली.