विद्यापीठातील प्राध्यापक भरतीसाठी पुन्हा जाहिरात; उमेदवारांना अर्जात बदल करण्याची संधी
आता प्राध्यापक भरती संदर्भातील निकषांमध्ये बदल केल्यामुळे पुन्हा एकदा नव्याने जाहिरात प्रसिद्ध करावी लागत आहे. कारण या दीड वर्षाच्या कालावधीत अनेक उमेदवारांनी पीएचडी पूर्ण केली आहे. तर काही नेट- सेट परीक्षा उत्तीर्ण झाले असून अनेकांनी विविध रिसर्च पेपर लिहिले आहेत.त्यामुळे या उमेदवारांना अर्जात दुरूस्ती करण्याची संधी द्यावी लागणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
प्राध्यापक भरती संदर्भात राज्य शासनाने 6 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशातील नियमावलीचे काटेकोर पालन करून प्राध्यापक भरती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना मंगळवारी (दि.28)दिले. त्यामुळे पुढील काही दिवसात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील सर्व विद्यापीठाकडून प्राध्यापक भरती संदर्भातील जाहिराती नव्याने प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
मुंबई येथे मंत्रालयात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठांमधील प्राध्यापक पदभरती संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीदरम्यान प्राध्यापक पदभरती प्रक्रियेत गती येण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि धोरणात्मक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव प्रताप लुबाळ, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी तसेच अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.
प्राध्यापक भरती बाबत सुमारे दीड वर्षांपासून विद्यापीठांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मराठा आरक्षणातील बदलत्या तरतुदींमुळे यापूर्वी विद्यापीठांना दोन वेळा जाहिरात प्रसिद्ध करावी लागली होती. त्यानंतर आता प्राध्यापक भरती संदर्भातील निकषांमध्ये बदल केल्यामुळे पुन्हा एकदा नव्याने जाहिरात प्रसिद्ध करावी लागत आहे. कारण या दीड वर्षाच्या कालावधीत अनेक उमेदवारांनी पीएचडी पूर्ण केली आहे. तर काही नेट- सेट परीक्षा उत्तीर्ण झाले असून अनेकांनी विविध रिसर्च पेपर लिहिले आहेत.त्यामुळे या उमेदवारांना अर्जात दुरूस्ती करण्याची संधी द्यावी लागणार आहे. त्यातच लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुकांचे आचारसंहिता जाहीर होणार आहेत. त्यामुळे भरती प्रक्रिया लवकर पूर्ण होणे शक्य आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे?
eduvarta@gmail.com