विद्यापीठातील 111 प्राध्यापक पदासाठी नव्याने मागवले अर्ज; 8 नोव्हेंबरपासून प्रक्रिया सुरू 

विद्यापीठातर्फे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या 47 जागांसाठी सहयोगी प्राध्यापक व  प्राध्यापक पदाच्या प्रत्येकी 32 अशा एकूण 111 जागांसाठी हे अर्ज मागवले आहेत.

विद्यापीठातील 111 प्राध्यापक पदासाठी नव्याने मागवले अर्ज; 8 नोव्हेंबरपासून प्रक्रिया सुरू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

SPPU Recruitment : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) विविध शैक्षणिक विभागांमध्ये शासनमान्य प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक (Professor, Associate Professor and Assistant Professor)संवर्गातील 111 शिक्षकी पदांच्या भरती प्रक्रियेसाठी (Recruitment process)पुन्हा एकदा अर्ज मागविण्यात आले आहेत. यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना अर्जात दुरुस्ती करता येणार असून ज्यांनी अद्याप अर्ज केला नाही,असे नवीन उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे विद्यापीठातील प्राध्यापक पदाच्या रिक्त जागांसाठी 13 सप्टेंबर 2024 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र,काही कारणांमुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती. राज्य शासनाने विद्यापीठातील प्राध्यापक पदाच्या भरती प्रक्रियेसाठी नव्याने नियमावली प्रसिद्ध केले. 6 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या नियमावलीनुसार आता विद्यापीठाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. विद्यापीठातर्फे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या 47 जागांसाठी सहयोगी प्राध्यापक व  प्राध्यापक पदाच्या प्रत्येकी 32 अशा एकूण 111 जागांसाठी हे अर्ज मागवले आहेत.

विद्यापीठाकडे यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना येत्या 8 नोव्हेंबरपासून 7 डिसेंबरपर्यंत अर्जामध्ये दुरुस्ती करता येणार आहे. तर ऑनलाईन अर्जाची प्रत 12 डिसेंबरपर्यंत विद्यापीठाच्या शिक्षक कक्षाकडे जमा करावी लागणार आहे. विद्यापीठाने 13 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती संदर्भातील शुद्धिपत्र विद्यापीठाच्या संकेतस्थळावर 7 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.