Recruitment : क्रेडिफिनमध्ये ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांची होणार भरती!

आता कंपनीमार्फत पुढील दोन महिन्यांत ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांची भरती होणार असून, नवीन ठिकाणी २०० कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. यासोबतच, ई-व्हेहिकल कर्ज आणि तारण कर्जाची उत्पादने देखील कंपनीमार्फत सादर केली जाणार आहेत.

Recruitment : क्रेडिफिनमध्ये ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांची होणार भरती!

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

वित्तीय संस्थांपैकी एक असलेली एनबीएफसी (NBFC) कंपनी क्रेडिफिन लिमिटेडने (माजी पीएचएफ (PHF) लीजिंग लिमिटेड) (Credifin Limited) महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि मध्यप्रदेश (Maharashtra, Chhattisgarh and Madhya Pradesh) या राज्यांमध्ये आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याची घोषणा (Business expansion announcement) केली आहे. त्यामुळे आता कंपनीमार्फत पुढील दोन महिन्यांत ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांची भरती होणार असून, नवीन ठिकाणी २०० कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. यासोबतच, ई-व्हेहिकल कर्ज आणि तारण कर्जाची उत्पादने देखील कंपनीमार्फत सादर केली जाणार आहेत.

क्रेडिफिन लिमिटेडने महाराष्ट्रातील नागपूर, मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये भक्कम उपस्थिती निर्माण करण्याचे नियोजन केले आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर, बिलासपूर आणि कोरबा या ठिकाणी विस्ताराची योजना आखली आहे. तर मध्य प्रदेशात, विशेषतः भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर, उज्जैन, जबलपूर, सागर, रीवा, सतना, नीमच आणि गुना यासारख्या शहरांमध्ये नवीन कर्ज ऑफर सुरू करण्यावर देखील लक्ष केंद्रित करणार आहे. यासोबतच मध्य प्रदेशमध्ये आधीच वाहन कर्ज व्यवसायात प्रगती केलेली ही कंपनी २०२५ मध्ये तारण कर्ज (एलएपी-लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी) सुरू करणार आहे.

कंपनीच्या विस्ताराबाबत बोलताना, आमची उद्दिष्टे वित्तीय सेवा क्षेत्रात भक्कम उपस्थिती निर्माण करणे आणि कमी सेवा मिळणाऱ्या ग्राहक गटांसाठी आर्थिक उपाय सुलभ करणे अशी आहेत असे मत क्रेडिफिन लिमिटेडचे सीईओ शल्य गुप्ता यांनी व्यक्त केले आहे.

क्रेडिफिन लिमिटेडविषयी 

१९९२ मध्ये स्थापन झालेली क्रेडिफिन लिमिटेड ही मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध एनबीएफसी कंपनी आहे. तिचे मुख्यालय जालंधर येथे असून, दिल्ली-एनसीआरमध्ये कॉर्पोरेट कार्यालय आहे. ही कंपनी १९९८ पासून भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नोंदणीकृत आहे. ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत असलेली क्रेडिफिन १५० हून अधिक ठिकाणी कार्यरत आहे आणि ५५० हून अधिक लोकांना रोजगार देते. क्रेडिफिनने आर्थिक वर्ष २०२४-२०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत ३१२ कोटी एयूएमची (AUM) कमाई केली.

 दरम्यान, कंपनी ई-वाहने, विशेषतः ई-रिक्षा, ई-लोडर आणि टू-व्हीलर ईव्हीसाठी वित्तपुरवठा करत आहे. नव्या विस्तारामुळे क्रेडिफिनची देशभरातील उपस्थिती अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.