प्राध्यापक भरतीचं ठरल; सहसंचालकांना प्रशिक्षण,जूनपूर्वीच मिळणार नियुक्ती
कोणत्या महाविद्यालयात किती प्राध्यापकांची पदे उपलब्ध होतात.तसेच ही पदे तपासून निश्चित कशी करावीत.यासंदर्भात राज्यातील सर्व उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील सह संचालकांसह प्रमुख अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्याच्या उच्च शिक्षण विभागातर्फे प्राध्यापक भरतीबाबत निर्णय (Faculty recruitment decision)घेण्यास विलंब झाला.त्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये नाराजी आहे.मात्र,राज्यपाल कार्यालयाने प्राध्यापक भरतीसाठी 60:40 चा फॉर्म्युला (60:40 formula for professor recruitment)निश्चित केला असून याच निकषावर प्राध्यापक भरती प्रक्रिया राबवण्याबाबत उच्च शिक्षण विभागाने (Department of Higher Education)आता कंबर कसली आहे. त्यातच येत्या 18 डिसेंबर रोजी राज्यातील सर्व विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांना (Joint Director of Higher Education)महाविद्यालयातील रिक्त असलेल्या प्राध्यापक भरतीसंदर्भात आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच शिबीर लावून रोष्टर तपासणी करण्याचे आणि येत्या जूनमहिन्यांपर्यंत प्राध्यापक भरती पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे,असे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.
राज्यातील विविध अकृषी विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांची हजारो पदे रिक्त आहेत.त्यातील सुमारे 5 हजार 20 पदे भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून वित्त विभागाने सुध्दा पद भरतीस हिरवा कंदील दर्शविला आहे. त्यातच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सुध्दा याबाबत अधिकृत घोषणा केली.विद्यापीठातील सुमारे 750 प्राध्यापकांच्या भरतीबाबत 60:40 चे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी संख्येनुसार प्राध्यापकांच्या रिक्त जागांचा आढावा घेण्यात आला आहे.त्यानुसार कोणत्या महाविद्यालयात किती प्राध्यापकांची पदे उपलब्ध होतात.तसेच ही पदे तपासून निश्चित कशी करावीत.यासंदर्भात राज्यातील सर्व उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील सह संचालकांसह प्रमुख अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
मुंबई येथील होमी भाभा विद्यापीठात या संदर्भातील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून प्रशिक्षणाला उपस्थित राहण्याबाबत सर्वांना सुचना दिल्या आहेत.त्यामुळे पालिका निवडणूकीची आचार संहिता संपताच प्राध्यापक भरती प्रक्रियेला गती मिळणार आहे. राज्यातील विविध संघटनांनी आंदोलने केली तसेच शासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. त्यातच प्राध्यापक नसल्याने विद्यापीठांचे रॅकिंग घसरत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली.त्यामुळे पुढील काही महिन्यात महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची पदे भरली जातील,असे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे.
eduvarta@gmail.com