पुणे पुस्तक महोत्सव :वसुंधरा संरक्षणाची शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

शांतता..पुणेकर वाचत आहेत; तसेच भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्स ' हा विश्वविक्रम नोंदविण्यात आला. या साखळीतील तिसरा विश्वविक्रम हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचप्रणाला अनुसरून करण्यात आला.

पुणे पुस्तक महोत्सव :वसुंधरा संरक्षणाची शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी तिसरा विश्वविक्रम करण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या पंचप्रणाला अनुसरून हा विश्वविक्रम करण्यात आला . या विश्वविक्रमासाठी सहभाग घेतलेल्या हजारो नागरिकांनी वसुंधरा संरक्षणाची शपथ घेतली. यात युवा पिढीचा सहभाग आश्वासक होता. या विश्वविक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी दिली.

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर गेले नऊ दिवस जल्लोषात सुरू असलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाचा समारोप रविवारी सायंकाळी झाला. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ राजेंद्र शेंडे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, कार्यवाह आनंद काटीकर, लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक किरण ठाकूर, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, अभिनेते प्रवीण तरडे आदी उपस्थित होते. 

यंदाच्या महोत्सवात एकूण तीन विश्वविक्रम करण्यात आले. यंदाच्या महोत्सवात शांतता..पुणेकर वाचत आहेत; तसेच भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्स ' हा विश्वविक्रम नोंदविण्यात आला. या साखळीतील तिसरा विश्वविक्रम हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचप्रणाला अनुसरून करण्यात आला. 'लार्जेस्ट ऑनलाईन व्हिडिओ अल्बम ऑफ पीपल रीसायटिंग ओथ/ प्लेज ' असे या विश्वविक्रमाचे नाव आहे. 

या विश्वविक्रमासाठी २७ हजार १४० नागरिकांनी वसुंधरा संरक्षणासाठी शपथ घेऊन, व्हिडीओ रेकॉर्ड केले. त्यानंतर हे व्हिडिओ ऑनलाईन पद्धतीने अपलोड करण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया केवळ ४ दिवसांत करण्यात आली. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या नियमानुसार २१ हजार ४९८ नागरिकांचे व्हिडिओ ग्राह्य धरून नवा विश्वविक्रम नोंदविण्यात आला. यापूर्वीचा विश्वविक्रम हा ११ हजार २५१ 'ऑनलाईन व्हिडिओ अल्बम'चा होता. या विश्वविक्रमसाठी बिसलेरी कंपनीचे सहकार्य लाभले आहे. हा विश्वविक्रम होण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि आयटी विभागाने प्रयत्न केल्याची माहिती पांडे यांनी दिली. यावेळी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी स्वप्निल डांगोरीकर, बिसलेरी कंपनीचे अधिकारी के. गणेश, महोत्सव संयोजन समितीचे सदस्य डॉ. संजय चाकणे, प्रसेनजीत फडणवीस, बागेश्री मंठाळकर, राजश्री जायभाय, मिलिंद वेर्लेकर आदी उपस्थित होते.

----

पुणे पुस्तक महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, लाखो नागरिकांनी महोत्सवाला भेट देत वाचन संस्कृती वाढविण्याचे काम केले आहे. या महोत्सवात नागरिकांनी भरभरून पुस्तकांची खरेदी केली. अनेक पुस्तकांचे प्रकाशन झाले. या सर्वांची माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल. महोत्सवातील सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमांना झालेली गर्दी अविस्मरणीय होती. पुणे पुस्तक महोत्सव हा पुणेकरांच्या हक्काचा महोत्सव झाला आहे. या महोत्सवाला पुणेकरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत.

- राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव