संपूर्ण जगच आघाडीच्या राजकारणासारखे झाले : डॉ.एस. जयशंकर

संपूर्ण जगच आघाडीच्या राजकारणासारखे झाले : डॉ.एस. जयशंकर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

आताच्या काळात अमेरिकेशी संवाद साधणे कठीण झाले आहे.चीनचे व्यवस्थापन गुंतागुंतीचे झाले आहे.युक्रेन युद्ध, रशियापासून दूर जाण्यासाठीच्या दबावामुळे रशियाला पुनर्खात्री देणे गुंतागुंतीचे झाले आहे. जपानला सोबत आणण्यासाठी वेग वाढवण्याचा प्रयत्न आहे. अशावेळी युरोपला आपला महत्त्वाचा सहकारी करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे,असे मत परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मांडले. 

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात डिप्लोमसी टू डिस्कोर्स या विषयावरील सत्रात जयशंकर बोलत होते. राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक युवराज मलिक यांनी संवाद साधला. यावेळी जयशंकर बोलत होते.

डॉ. एस. जयशंकर म्हणाले,आपण कधी बोलायचे, कधी नाही बोलायचे हे परिस्थितीवर अवलंबून आहे. आताच्या स्पर्धात्मक काळात आपण बोललो नाही, तर दाबून टाकले जाईल. त्यामुळे आवाज उठवण्याचीही गरज आहे. मात्र, त्यासाठी अंदाज घेऊन बोलले पाहिजे. देशाची ओळख नेतृत्त्वाने, दूरदृष्टीने होते. अंमलबजावणीसाठी लोक आहेत. मात्र, दूरदृष्टी, नेतृत्त्व, आत्मविश्वासामुळे फरक पडतो.

आपल्या देशात कधीकाळी आघाडीच्या राजकारणाचा काळ होता. आज संपूर्ण जगच जणू आघाडीच्या राजकारणासारखे झाले आहे. कुणाकडेही स्पष्ट बहुमत नाही, कोणत्या आघाडीकडेही बहुमत नाही. त्यामुळे सतत परिस्थिती बदलत आहे. अशावेळी आपण परिस्थितीनुसार चपळ राहून राष्ट्रीय हितासाठी काय उपयुक्त ठरेल यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. 

आपले शेजारी आपल्यापेक्षा लहान आहेत, ते आपल्याशी संबंधित आहेत. त्यांच्याकडेही राजकारण होते. ते कधी आपल्यावर टीका करतात, कधी आपले कौतुक करतात. कारण, आपण त्यांच्या राजकारणाचाही भाग आहोत. अशावेळी त्यांच्याशी संबंध स्थिर राहतील याची खात्री करावी लागते. श्रीलंकेत आलेल्या चक्रीवादळावेळी भारतानेच सर्वप्रथम मदत केली. करोना काळात शेजारी राष्ट्रांना लस पुरवली. युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर गहु, पेट्रोल, खतांचा पुरवठा थांबल्यावर ते भारताने उपलब्ध करून दिले. त्यामुळे कुटुंबाप्रमाणे जबाबदारीने वागणे महत्त्वाचे आहे. परराष्ट्र धोरण ठरवताना निवड करावी लागते, स्पष्टता असावी लागते. मात्र, आपल्यासाठी हितकारक काय हे पाहिले पाहिजे,

आयुष्य ही निर्णयांची मालिका आहे. तुम्हाला आयुष्यात अचूक परिस्थिती, आधीच माहिती मिळून निर्णय घेता येणार नाही. आयुष्यात धोका स्वीकारला पाहिजे. निर्णय प्रक्रिया मला आकर्षित करते. त्यामुळे मला चरित्रे वाचायला आवडतात. मी राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विद्यार्थी आहे. या विषयांतील बहुतांश पुस्तके परदेशी लेखकांची असतात. मात्र, आपण आपल्या गोष्टी ऐकून मोठे झालो आहोत, तर आपल्या संकल्पना का मांडल्या जात नाहीत हा प्रश्न होता. भारताबाबतीत त्याच त्याच कल्पना, शब्द वापरले जातात श्रीकृष्ण, हनुमान हे महान राजनीतीज्ञ होते. आपण हे नीट मांडले नाही, तर आपल्या संस्कृतीवर अन्याय होईल. 'इंडिया वे' या पुस्तकातून माझ्यातला आक्रोश बाहेर आला, असे डॉ. जयशंकर यांनी सांगितले.

आपण कधी बोलायचे, कधी नाही बोलायचे हे परिस्थितीवर अवलंबून आहे. आताच्या स्पर्धात्मक काळात आपण बोललो नाही, तर दाबून टाकले जाईल. त्यामुळे आवाज उठवण्याचीही गरज आहे. मात्र, अंदाज घेऊन बोलले पाहिजे. देशाची ओळख नेतृत्त्वाने, दूरदृष्टीने होते. त्याच्या अंमलबजावणीसाठी लोक आहेत. दूरदृष्टी, नेतृत्त्व, आत्मविश्वासामुळे फरक पडतो. ‘ब्रेन ड्रेन’ हा व्यामिश्र विषय आहे. जगातील संधी भारतासाठी खुल्या होत आहे. रशियात नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. जगात भारताचा ‘ग्लोबल ब्रँड’ निर्माण झाला आहे. त्याचा फायदा घेऊन तरुणाईने जगाकडे ‘ग्लोबल वर्कप्लेस’ म्हणून पाहिले पाहिजे, असेही डॉ. जयशंकर यांनी नमूद केले.