दहा वर्षात टिकणारे संगीत झाले नाही; रिकी केज यांचे परखड मत

सध्या बाजारात संगीत उपलब्ध करून देणारे अनेक मोबाइल ॲप्लिकेशन उपलब्ध आहेत. मात्र, त्या ॲपवर भारतीय दर्जेदार संगीत सहज दिसून येत नाही.

दहा वर्षात टिकणारे संगीत झाले नाही; रिकी केज यांचे परखड मत

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

‘सध्या एका चित्रपटाची गाणी खूप गाजत आहेत. सर्वत्र ते एकच संगीत ऐकू येत आहेत. गेल्या दहा वर्षात अशी अनेक गाणी गाजली. मात्र, ती गाणी केवळ "ट्रेडिंग" होती. तीन महिन्यानंतर ती गाणी गायब होतात. या दहा वर्षात टिकून राहील असे चित्रपट संगीत निर्माण झाले नाही,’ असे परखड मत ग्रॅमी पुरस्कार विजेते संगीतकार रिकी केज यांनी शनिवारी व्यक्त केले.

पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत लिट फेस्टमध्ये रिकी केज यांनी "फ्रॉम ग्रॅमी गोल्ड टू ग्रीन अर्थ" या कार्यक्रमात संवाद साधला. प्रियांशी शर्मा यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे उपस्थित होते. “ए. आर. रहमान किंवा अन्य संगीतकारांची नव्वदच्या दशकातील किंवा त्या नंतरच्या दशकातील गाणी आजही गुणगुणली जातात. हे त्या संगीताचे यश आहे,’ असे यावेळी रिकी केज यांनी सांगितले.

रिकी केज म्हणाले, “सध्या बाजारात संगीत उपलब्ध करून देणारे अनेक मोबाइल ॲप्लिकेशन उपलब्ध आहेत. मात्र, त्या ॲपवर भारतीय दर्जेदार संगीत सहज दिसून येत नाही. अशी ॲप सोशल मीडिया अल्गोरीदमवर कार्यरत राहतात. त्यामुळे नागरिकांनी चांगले संगीत शोधत राहिले पाहिजे. म्हणजे त्यानुसार अल्गोरीदम सेट होईल.’

कधी कधी तुम्ही आर्टिस्ट म्हणून तुमच्या कलाकृतीच्या प्रेमात पडता. पण, तुमची कलाकृती दुसऱ्याच्या नजरेतून पाहण्याची काल अवगत केली पाहिजे. तसेच, कलाकार असण्याबरोबरच तुम्ही व्यावसायिक आणि लीडरही असले पाहिजे. कलेच्या व्यासपीठावर आता अनेक घटकांना सामावून घ्यावे लागते, त्याचे डील करावे लागते. यासाठी इतर कौशल्य गरजेची आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

............

शालेय शिक्षणात संगीत अनिवार्य करावे

शाळा, महाविद्यालयात अनेक विषय शिकवले जातात. मात्र, आपण एखादाच विषय स्पेशल म्हणून घेतो. त्यात करिअर करतो. याचा अर्थ अभ्यासलेले बाकीचे शिक्षण वाया जात नाही. याच प्रमाणे शालेय शिक्षणात संगीत शिक्षण अनिवार्य केले पाहिजे. काही जण संगीतात करिअर करतील. मात्र, अनेक जण चांगले संगीत श्रोते तयार होतील. सध्या चांगल्या संगीतासाठी चांगले श्रोते गरजेचे आहेत.

............