मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापक भरतीसाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नवीन मुदतवाढीनुसार उमेदवारांना आता २ जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मुंबई विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ https://mu.ac.in/ वर जाऊन अर्ज करता येणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मुंबई विद्यापीठाअंतर्गत (Mumbai University) राबवण्यात येत असलेल्या प्राध्यापक भरतीसाठी (Mumbai University Professor Recruitment) मुदतवाढ देण्यात आली आहे. यापुर्वी देण्यात आलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर विद्यापीठाने उमेदवारांचे हित लक्षात ही मुदत वाढवण्याचा (Extension of deadline for professor recruitment) निर्णय घेतला आहे. त्यामुळे अद्याप अर्ज न करू शकलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी म्हणावी लागेल. विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नवीन मुदतवाढीनुसार उमेदवारांना आता २ जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मुंबई विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ https://mu.ac.in/ वर जाऊन अर्ज करता येणार आहे.
हेही वाचा - पुणे पुस्तक महोत्सव :वसुंधरा संरक्षणाची शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये
या भरती मोहिनेअंतर्गत विद्याशाखांचे अधिष्ठाता पदांच्या ४ जागा, प्राध्यापक पदांच्या २१ जागा, सहयोगी प्राध्यापक पदांच्या ५४ तर सहायक प्राध्यापक पदांच्या ७३ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण १५२ पदे भरली जाणार आहेत. विद्यापीठाने ३ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार, या सर्व पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ डिसेंबर अशी निश्चित केली होती. मात्र, उमेदवारांच्या सूचनांचा तसेच काही प्रशासकीय बाबींचा विचार करून २ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
ऑनलाइन अर्जासोबत सादर करायच्या अकॅडेमिक, टीचिंग अँड रिसर्च क्रेडेन्शियल (एटीआर) या कागदपत्रांच्या तीन प्रतींसह अर्जाचा प्रिंटआउट विभागात (कक्ष २५), मुंबई विद्यापीठ, फोर्ट येथे जमा करण्यासाठीची तारीखही वाढवली आहे. ही कागदपत्रे आता ९ जानेवारी २०२६ रोजी सायं. ५ वाजेपर्यंत स्वीकारली जातील. विद्यापीठ प्रशासनाच्या मते, भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि अधिकाधिक पात्र उमेदवारांना संधी मिळावी, या उद्देशाने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
त्यामुळे अद्याप अर्ज न केलेल्या किंवा कागदपत्रांच्या पूर्ततेत अडचणी येत असलेल्या उमेदवारांना आवश्यक तयारीसाठी अतिरिक्त कालावधी उपलब्ध झाला आहे. विद्यापीठाच्या सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध सुधारित अधिसूचनेची नोंद घ्यावी आणि दिलेल्या मुदतीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे. ही अधिसूचना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद करांडे यांनी जाहीर केली आहे.
eduvarta@gmail.com