आठवीतील विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, पिडितेने त्या अवस्थेतच पोलीस स्टेशन गाठलं..

सांगलीच्या ईश्वरपूर येथून मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन शाळकरी मुलीवर दोघांनी मिळून अत्याचार केल्याचा अमानुष प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण सांगली जिल्हा हादरला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

आठवीतील विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, पिडितेने त्या अवस्थेतच पोलीस स्टेशन गाठलं..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सध्या घडणाऱ्या शाळकरी मुलींवरील अत्याचार, खून, बलात्कार यांसारख्या घटनांनी संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा धाक राहिला आहे का नाही? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जळगावच्या तरवाडे बुद्रुक येथे शाळेतून घरी येताना बेपत्ता झालेल्या 9 वर्षीय धनश्री उमेश शिंदे हिचा चार दिवसांनी मृतदेह सापडला. ही घटना ताजी असतानाच आता सांगलीच्या ईश्वरपूर (Ishwarpur Crime News) येथून मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. इयत्ता आठवीत (Eighth grade girl) शिकणाऱ्या अल्पवयीन शाळकरी मुलीवर (School girl raped) दोघांनी मिळून अत्याचार केल्याचा अमानुष प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण सांगली जिल्हा हादरला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे (Fear among parents) वातावरण निर्माण झालं आहे. 

हेही वाचा - आर्टीच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाची निवड यादी जाहीर

मिळालेल्या माहितीनुसार, ऋतीक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे दोन मुलांनी पिडित अल्पवयीन मुलीला फसवून दुचाकीवरून उसाच्या शेतात घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केला. मुलीने विरोध केल्याने तिला मारहाणही करण्यात आली. अत्याचार केल्यानंतर दोन्ही आरोपी मुलीला विवस्त्र अवस्थेत टाकून तिथून फरार झाले. त्यानंतर पिडित मुलीने त्याच अवस्थेत पोलीस स्टेशन गाठलं. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता ईश्वरपूर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत दोघांनाही तत्काळ अटक केली. 

पीडिता ही ईश्वरपूर येथील एका शाळेत 8 वी मध्ये शिक्षण घेते. पीडिता आईसमवेत ईश्वरपूरमध्ये राहण्यास आहे. मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ऋतीक महापुरे याने पीडितेला फोन करून ईश्वरपूरमधील शिराळा नाक्यावर बोलावून घेतले. त्यानंतर ऋतीक आणि आशिष या दोघांनी तिला दुचाकीवरून तुजारपूर फाट्यावरील एका उसाच्या शेतात घेऊन गेले. त्या ठिकाणी दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. यावेळी विरोध केल्याने तिला मारहाणही करण्यात आल्याची माहिती पिडित मुलीने पोलिसांत दिली आहे. 

अत्याचार केल्यानंतर दोघांनी तिला विवस्त्र अवस्थेत सोडून तिचे कपडे घेऊन घटनास्थळावरून फरार झाले. यानंतर पीडित मुलगी ही विवस्त्र अवस्थेत ईश्वरपूरच्या दिशेने चालत जाताना काही जणांना दिसून आली. त्यांनी तिला तातडीने कपडे दिले. तसेच या प्रकरणाची माहिती ईश्वरपूर पोलिसांना दिली. पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिने घडला प्रकार सांगताच हा अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यापैकी ऋतीक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीच मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तसेच त्याच्या विरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.