सांस्कृतिक ठेवा वाचवण्यासाठी राखीगढीचे महत्त्व पटवणे आवश्यक: डॉ. वसंत शिंदे
१२ हजार वर्षांपूर्वी अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेवर शिकार करणाऱ्यांच्या गटापैकी एक गट भारतात आला. त्यांच्या डीएनएमध्ये उत्क्रांती झाली. तीच जनुके पुढे आली.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राखीगढीच्या संशोधनाची दखल सरकारने पूर्वीच घ्यायला हवी होती. मात्र, आता या संशोधनाचे महत्त्व सरकारला पटले आहे. त्यामुळे नव्या अभ्यासक्रमात या संशोधनाचा समावेश होईल.तसेच आपला सांस्कृतिक ठेवा वाचवण्यासाठी सर्वसामान्यांना त्याचे महत्त्व पटवणे आवश्यक असून त्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण काम करत आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. वसंत शिंदे यांनी केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवातील पुणे लिट फेस्टमध्ये ‘राखीगढी संशोधन’ या विषयावर डॉ. शिंदे यांच्याशी पत्रकार मयूरेश प्रभुणे यांनी संवाद साधला.त्यावेळी शिंदे बोलत होते.
डॉ. शिंदे म्हणाले, सरस्वती नदीच्या खोऱ्यात २००६ मध्ये संशोधन सुरू केले. तिथे चार ठिकाणी उत्खनन केल्यावर इसवी सनापूर्वी ६ हजार वर्षापूर्वीचे अवशेष मिळाले. आर्य बाहेरून भारतात आल्याबाबत मांडलेल्या सिद्धांताला पुरावा देण्यात आला नव्हता. राखीगढीमध्ये सापडलेल्या मानवी अवशेषातून डीएनए मिळवून त्याचे जनुकीय क्रमनिर्धारण केले. त्याचे तीन नमूने तयार करून एक नमूना कोरिया, एक नमूना हार्वर्डला पाठवला. पडताळणी केल्यावर आलेले निष्कर्ष आमच्या निष्कर्षांशी जुळले. त्यातून हडप्पा संस्कृती इथल्याच लोकांमुळे घडली, त्यांचा विस्तार मोठा होता. मेसोपोटेमिया-इराण येथे व्यापार होत होता. या व्यापाराचा वापर शहरीकरणासाठी केला गेला. दहा हजार वर्षांचे जनुकीय सातत्य होते हे सिद्ध झाले. राखीगढी येथील संस्कृती इसवी सन पूर्व सहा हजार वर्षांपूर्वीची आहे.
राखीगढी येथील संशोधनातून हडप्पा संस्कृती आणि वैदिक संस्कृती एकच होती हे सप्रमाण दाखवता येते. सरस्वती नदीचा उल्लेख ऋग्वेदात आहे. अग्निपूजेसारख्या विधींचे पुरावे मिळाले आहेत. आर्य बाहेरून आले असते जनुकीय सातत्य थांबले असते. १२ हजार वर्षांपूर्वी अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेवर शिकार करणाऱ्यांच्या गटापैकी एक गट भारतात आला. त्यांच्या डीएनएमध्ये उत्क्रांती झाली. तीच जनुके पुढे आली. २५ ते ३० टक्के जनुके भारतीय आहेत. बाकींमध्ये इराणी, पूर्व आशियाई अंश सापडला. इराण आणि तुर्कमेनिस्तान येथील संशोधनातून मिळालेल्या डीएनएमध्ये हडप्पाकालीन डीएनएचे अंश सापडले. अंदमान, निकोबार ते लडाखमध्ये असलेल्या आजच्या लोकांमध्ये हडप्पाकालीन डीएनए सापडतो. हडप्पाकालीन लोकांच्या विकासाबाबतचे पुरावे आता जगाने मान्य केले आहेत.
हरियाणा हे भारतीय संस्कृतीचे केंद्र आहे. हडप्पा संस्कृती ही भारतीय संस्कृतीचा पाया आहे. स्वातंत्र्यानंतर भारतात मोठ्या प्रमाणात संशोधन झाले. मात्र, ते प्रसिद्ध झाले नाही. ब्रिटिशांनी हडप्पा, मोहेंजोदारोचे काम प्रसिद्ध केले. ढोलावीरा हे सिंधू संस्कृतीच्या दृष्टीने फार महत्त्वाचे ठिकाण आहे. मात्र, त्याचेही संशोधन प्रसिद्ध नाही. हडप्पाकालीन दोन हजार पैकी १५०० स्थळे भारतात जम्मूपासून महाराष्ट्रापर्यंत पसरलेली आहेत. सरस्वती नदी होती, तिच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वसाहती होत्या हे सिद्ध झाले आहे. दोन तृतीयांश वसाहती सरस्वती नदीच्या खोऱ्यात होत्या, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.
eduvarta@gmail.com