विज्ञानाची मानवी प्रगतीशी असलेली सांगड होतेय कमी!

तिबेटी धर्मगुरू परमपावन दलाई लामा यांच्या आत्मचरित्राचा ‘विजनवासातील स्वातंत्र्य’ हा मराठी अनुवाद विजय गोखले यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

विज्ञानाची मानवी प्रगतीशी असलेली सांगड होतेय कमी!

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

आधुनिक काळात विज्ञानाची मानवी प्रगतीशी असलेली सांगड कमी होत चालली आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाचे (Science and Technology) विकासोन्मुख मार्ग सकारात्मक आहेत, असे म्हणणे अवघड होत आहे. काही वेळा तर विज्ञानाचा दुरुपयोग होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शांतीपूर्ण प्रगतीचा संदेश मानवतावादी भूमिकेतून देणाऱ्या दलाई लामा (Dalai Lama) यांचे कार्य औचित्यपूर्ण आहे, असे प्रतिपादन माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले (Vijay Gokhale) यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा (SPPU) पाली व बौद्ध अध्ययन विभाग आणि देशना इन्स्टिट्यूट ऑफ बुद्धिस्ट अॅंड अॅलाईड स्टडीज् यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तिबेटी धर्मगुरू परमपावन दलाई लामा यांच्या आत्मचरित्राचा ‘विजनवासातील स्वातंत्र्य’ हा मराठी अनुवाद गोखले यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. याप्रसंगी पुस्तकाचे अनुवादक, तिबेटन व संस्कृतचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. श्रीकांत बहुलकर आणि प्रसिद्ध अनुवादक शुचिता नांदापूरकर-फडके, विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, विद्यापीठाच्या पाली आणि बौद्ध अध्ययन विभागाचे विभागप्रमुख डॉ. महेश देवकर आदी  उपस्थित होते.

निकाल वेळेत लावा; चंद्रकांत पाटील यांच्याकडून विद्यापीठ अधिकाऱ्यांची कानउघाडणी

गोखले म्हणाले, दलाई लामा हे जागतिक पातळीवरचे एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आहे. ते शांतीदूत आहेत. विशेषत: युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर, दहशतवादाच्या छायेत जागतिक स्तरावर अनेक अर्थव्यवस्था कोलमडत असताना, हवामानबदलाचे गंभीर परिणाम समोर येत असताना, दलाई लामा यांची मानवतावादी भूमिका महत्त्वाची आहे. ते केवळ धर्मगुरू नाहीत. ज्या संघर्षमय परिस्थितीशी लढत त्यांनी शांततेची, मानवतेची भूमिका मांडली, ते महत्त्वाचे आहे.

‘नालंदा ट्रॅडिशन ऑफ बुद्धिझम’ असा उल्लेख दलाई लामा सातत्याने करतात. प्रत्यक्षात आपल्या नालंदा, तक्षशिला, विक्रमशीला विद्यापीठांमधील कित्येक ज्ञानग्रंथांचा ठेवा तिबेटन हस्तलिखितांनीच जपला आहे. अनेक अभ्यासक तो ज्ञानठेवा पुन्हा आपापल्या भाषेत आणण्याच्या प्रयत्नात आहेत. तिबेटी ज्ञानपरंपरा, संस्कृती, कला यांना साह्य करण्याची आपली भूमिका योग्यच आहे. प्रस्तुत अनुवादामुळे दलाई लामा यांचे जीवन, त्यांचा संघर्ष आणि विचार मराठी भाषेत उपलब्ध झाले असून, ते प्रेरक ठरतील,’ असा विश्वास गोखले यांनी व्यक्त केला.

‘आयआयटी’चा डंका आता परदेशातही; भारताबाहेर सुरू होणार पहिला कॅम्पस

डॉ. करमळकर यांनी दलाई लामा यांच्या वैयक्तिक भेटीत सत्संगात असल्याचा अनुभव कथन केला. ‘दलाई लामा यांच्या कार्य आणि उपदेशामुळे जग प्रभावित झाले आहे. बौद्ध धर्म आणि तिबेटी परंपरा, संस्कृतीशी जगाचा परिचय दलाई लामा यांच्यामुळे झाला. त्यांचे आत्मचरित्र मराठी भाषेत आल्यामुळे त्यांचे व्यक्तित्व, जीवन आणि तत्त्वज्ञान यांचा परिचय अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असेही करमळकर म्हणाले.

अनुवादक म्हणून मनोगत मांडताना डॉ. बहुलकर म्हणाले,‘हे आत्मचरित्र दलाई लामा यांच्या आयुष्याचा, कर्तृत्वाचा आणि तिबेटी जनतेच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी चालविलेल्या शांतिपूर्ण लढ्याचा आलेख आहे. त्यांच्या विलक्षण आयुष्याची, अलौकिक व्यक्तिमत्वाची तसेच अनलंकृत, मिष्किल निवेदन-पद्धतीची ओळख यातून होते. बौद्ध तत्त्वज्ञानातील काही महत्त्वाच्या संकल्पनांचाही परिचय यातून घडतो,’. अनुवादक शुचिता नांदापूरकर यांनीही मनोगत मांडले. देशना इन्स्टिट्यूटच्या अॅकॅडमिक संचालक डॉ. लता देवकर यांनी आभार मानले. तलत परवीन यांनी परिचय करून दिला. डॉ. महेश देवकर यांनी प्रास्ताविक केले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD