विद्यापीठाच्या प्र- कुलगुरूंचे नाव ठेवले गुलदस्त्यात ; व्यवस्थापन परिषदेत निर्णय नाही

शनिवारी घेण्यात आलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्र-कुलगुरू पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ,हे स्पष्ट होणार होते. परंतु ,काही कारणास्तव प्र-कुलगुरू निवडीचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या प्र- कुलगुरूंचे नाव ठेवले गुलदस्त्यात ; व्यवस्थापन परिषदेत निर्णय नाही

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र- कुलगुरू (Savitribai Phule Pune University Pro VC )पदी कोण विराजमान होणार याबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. शनिवारी घेण्यात आलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत (management council meeting) प्र-कुलगुरू (Pro VC )पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ,हे स्पष्ट होणार होते. परंतु ,काही कारणास्तव प्र-कुलगुरू निवडीचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे,असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. 

हेही वाचा : शिक्षण सुधाकर जाधवर यांची प्राचार्य पदाची याचिका न्यायालयाने फेटाळली; तरीही विद्या परिषदेचे सदस्यत्व राहणार अबाधित

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड झाल्यानंतर पुढील दहा दिवसांच्या आत प्र-कुलगुरू निवडण्यात आले होते. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदी डॉ.सुरेश गोसावी यांचे निवड होऊन दीड महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला तरीही अद्याप पुणे विद्यापीठाला नवीन प्र-कुलगुरू मिळाले नाहीत. प्र-कुलगुरू पदासाठी अनेक मातब्बर उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळेच निवड प्रक्रियेस उशीर होत असल्याचे बोलले जात आहे.

वेगळी बातमी : शिक्षण उच्च शिक्षण सहसंचालकांवर प्राध्यापक संघटनेच्या अध्यक्षांनी टाकला दबाव ? ; पोलिसांकडे लेखी तक्रार

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या कार्यक्रम पत्रिकेवर प्र-कुलगुरू निवडीचा विषय हा पहिल्या क्रमांकावर होता. त्यामुळे शनिवारी त्यावर शिक्का मोर्तब होईल ,असे वाटत होते. विद्यापीठाचे अधिष्ठाता यांच्यासह संलग्न महाविद्यालयातील काही प्राचार्य व उपप्राचार्य प्र-कुलगुरू पदासाठी इच्छुक आहेत. विद्यापीठ कायद्यात झालेल्या सुधारणेनुसार विद्यापीठाच्या कुलगुरूंनी व्यवस्थापन परिषदेच्या संमतीने प्र-कुलगुरू पदावर पात्र उमेदवाराची निवड करणे अपेक्षित आहे. परंतु , शनिवारी यावर निर्णय घेता आला नाही,असेही सूत्रांनी सांगितले. 
        नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने कुलगुरूंरोबरच प्र-कुलगुरू सुद्धा महत्त्वाचे आहेत. त्यातच विद्यापीठाच्या अभ्यास मंडळ सदस्यांची नियुक्ती रखडलेली आहे. त्यामुळे विद्यापीठाला अभ्यासक्रम तयार करून त्यास विद्यापरिषदेत मंजुरी घेता आली नाही. प्र-कुलगुरू नियुक्तीमुळे कुलगुरूंच्या कामाचा भार काही प्रमाणात हलका होणार आहे.; तरीही विद्यापीठ प्रशासनातर्फे प्र-कुलगुरू पदाच्या निवडीसाठी विलंब का लावला जातोय ? असा प्रश्न उपस्थित होतो.