'नॅक का केले नाही' कॉलेजला नोटीस पाठवा; चंद्रकांत पाटील यांचे विद्यापीठांना स्पष्ट आदेश 

मूल्यांकन करण्याबाबत कल्पना देऊनही महाविद्यालयांकडून मूल्यांकन केले जात नसेल तर संबंधित महाविद्यालयांना एक आठवड्यात नोटीस पाठवा. तसेच अशा महाविद्यालयांची यादी तयार करून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करा. त्याचप्रमाणे संबंधित महाविद्यालयांची जाहिरात प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध करा.

'नॅक का केले नाही' कॉलेजला नोटीस पाठवा; चंद्रकांत पाटील यांचे विद्यापीठांना स्पष्ट आदेश 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या (Implementation of National Education Policy ) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महाविद्यालयांनी नॅक (National Assessment and Accreditation Council (NAACमूल्यांकन व पुनर्मूल्यांकन (evaluation and re-evaluation) करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सूचना देऊनही, नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांना आठवड्याभरात नोटीस पाठवा. तसेच संबंधित महाविद्यालयांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करा, असे स्पष्ट आदेश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Patil) यांनी शुक्रवारी विद्यापीठांच्या कुलगुरूंना दिले.

हेही वाचा : शिक्षण ‘नॅक’बाबत मंत्री चंद्रकांत पाटील थेट मंत्रालयात घेणार विद्यापीठांची ‘हजेरी’

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम ११० मधील पोट कलम (४) मधील तरतुदीनुसार विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घेणे बंधनकारक आहे. नॅक मूल्यांकन न केल्यास संबंधित महाविद्यालयांची संलग्नता काढून घेण्याचे अधिकार विद्यापीठाला देण्यात आले आहेत. एकदाही नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांची यादी तयार करून उच्च शिक्षण संचालक कार्यालयाकडे सादर करण्याबाबत विद्यापीठांना पत्र पाठविण्यात आले होते. परंतु, विद्यापीठांनी संचालक कार्यालयाकडे या संदर्भातील माहिती सादर केली नाही. त्यामुळे ८ ते १३ सप्टेंबर या कालावधीत राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावर शुक्रवारी झालेल्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठांना याबाबत स्पष्ट आदेश दिले असल्याचे उच्च शिक्षण विभागातील अधिका-यांनी सांगितले. 

सर्व महाविद्यालयांनी मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन करून घेणे गरजेचे आहे. मूल्यांकन करण्याबाबत कल्पना देऊनही महाविद्यालयाकडून मूल्यांकन केले जात नसेल तर संबंधित महाविद्यालयांना एक आठवड्यात नोटीस पाठवा. तसेच अशा महाविद्यालयांची यादी तयार करून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करा. त्याचप्रमाणे संबंधित महाविद्यालयांची जाहिरात प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध करा,असे आदेश चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी झालेल्या बैठकीत दिल्याचे अधिका-यांनी सांगितले. 
दरम्यान, उच्च शिक्षण संचालक कार्यालयाने विद्यापीठांचे कान टोचल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठ प्रशासन खडबडून जागे झाले. सध्या नॅक मूल्यांकन केलेल्या महाविद्यालयांची माहिती संकलित करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला येत्या १३ सप्टेंबर रोजी संलग्न महाविद्यालयांची माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुणे विद्यापीठ काय माहिती सादर करणार याबाबत उत्सुकता आहे.