विद्यार्थ्यांनो, बॅंक खात्यात पैसे आले का? विद्यापीठाने वाटले तब्बल पाच कोटी

सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सुरू आहे.  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क/ पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) पाच विविध शिष्यवृत्ती प्रकारांत ७ हजार ४०२ विद्यार्थ्यांना एकूण ४ कोटी ९५ लाख ६२ हजारांची शिष्यवृत्तीचे वाटप केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी ही शिष्यवृत्ती (Scholarship News) वाटल्याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे (Dr. Sanjeev Sonawane) यांनी दिली. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सुरू आहे. (Pune University News)

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अर्थसाहाय्य योजना, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, महात्मा जोतीराव फुले गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना आणि स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना या पाच शिष्यृत्तीसाठी विद्यापीठाक़डे एकूण १४ हजार ८४७ अर्ज आले होते. छाननीनंतर पदवी अभ्यासक्रमासाठी ४ हजार ७११ व पदव्युत्तर अभ्याक्रमांसाठी २ हजार ६९१ असे एकूण ७ हजार ४०२ विद्यार्थी पात्र ठरले. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सुरू आहे.  

या सर्व शिष्यवृत्तींची सविस्तर माहिती, नियम, अटी याची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील ' विद्यापीठ विविध शिष्यवृत्ती २०२२-२३' या टॅबवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यापीठाची सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक घटकातील विद्यार्थ्यांचा विचार करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या विविध शिष्यवृत्ती योजना सुरू केल्या आहेत. दरवर्षी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवून विहित प्रक्रिया पार पाडत अतिशय पारदर्शीपणे विद्यापीठ ही प्रक्रिया पार पाडते. शिष्यवृत्तीची रक्कम ही थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होते, असे डॉ. सोनवणे यांनी सांगितले.

आरटीईच्या जागा ७२, अर्ज आले तब्बल साडे तीन हजार

गुणवत्ता असूनही शिक्षणापासून विद्यार्थिनी वंचित राहू नये यांच्यासाठी पदवी व पदव्युत्तर अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थिनींना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना शैक्षणिक योजना लागू आहे. याअंतर्गत एकूण १ हजार ४९५ विद्यार्थ्यांना ७४ लाख ७५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य ही योजना आर्थिक दुर्बल घटकांतील गुणवत्ताधारक गरजू पदवी व पव्युत्तर अव्यवसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. योजनेमध्ये १ हजार ४९२ विद्यार्थ्यांना ४४ लाख ७६ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेत सर्वाधिक शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे. मागासवर्गीय घटकातील गुणवत्ताधारक गरजू पदवी व पव्युत्तर अव्यवसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू आहे. एकूण २ हजार १७६ विद्यार्थी पात्र ठरले असून त्यांना १ कोटी ८९ लाक ८६ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. महात्मा जोतीराव फुले गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गतही १ कोटी ८४ लाख ७६ हजार शिष्यवृत्ती देण्यात आली. यामध्ये २ हजार ९० विद्यार्थी पात्र ठरले. स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजनेत कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक अडचणी जसे की, पुर, दुष्काळ, आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना४ही योजना लागू आहे. मागील शैक्षणिक वर्षात १४९ विद्यार्थी पात्र ठरले असून एक लाख ४९ हजार रुपयांचे वाटप झाले आहे.