ब्रेन हॅमरेज, कोमावर मात करत दिल्लीच्या माधवने बारावीत मिळवले ९३ टक्के गुण 

ब्रेन हॅमरेज, कोमावर मात करत दिल्लीच्या माधवने बारावीत मिळवले ९३ टक्के गुण 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

ध्येय स्पष्ट असेल आणि त्यापर्यंत पोहचण्याची प्रबळ इच्छा आणि प्रामाणिक प्रयत्न केले तर असाध्य गोष्टी सुद्धा साध्य होऊ शकतात, हे दिल्लीतील माधव शरण (Madhav Sharan)या १८ वर्षीय विद्यार्थ्याने सिद्ध करून दाखवले आहे. 
माधव शरण याचा ब्रेन हॅमरेजमुळे(brain haemorrhage)एक तृतीयांश मेंदू बाधित झाला होता. तो 10 दिवस कोमामध्ये होता. पण यावर मात करत नुकत्याच लागलेल्या CBSE च्या निकालात माधव ने ९३ टक्के गुण मिळवले आहेत. माधव हा एमिटी इंटरनॅशनल स्कूल, पुष्प विहारचा विद्यार्थी आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑगस्ट 2021 मध्ये दहावीनंतर माधवच्या मेंदूच्या क्षमतेवर परिणाम होऊ लागला. धमनी विकृतीमुळे, त्याच्या मेंदूमध्ये रक्त वाहू लागले आणि त्याच्या मेंदूच्या एक तृतीयांश भागावर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे त्यांना लेखन, गणित, तर्कशास्त्र आदी विषयांमध्ये अडचणी येऊ लागल्या. ब्रेन हॅमरेजनंतर माधव 10 दिवस कोमात होता.

वडील दिलीप शरण यांच्या म्हणण्यानुसार माधव कोमात गेल्यावर त्यांना हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी माधवची अवस्था पूर्वीसारखी होईल की नाही हे सांगणे कठीण होते. त्याला पूर्वीसारख्या गोष्टी समजतील की नाही. शुद्धीवर आल्यावर माधव कसे बोलावे हे पूर्णपणे विसरला होता.

दिलीप शरण म्हणाले, "पुढील एक वर्षभर माधववर अनेक गंभीर शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. त्याच्या कवटीचा एक भाग कापला गेला. असे असूनही माधव हिंमत हरला नाही. त्याने हळूहळू गतिशीलता मिळवली आणि बोलायला सुरुवात केली. यानंतर माधव त्याच्या पुस्तकांकडे वळला. सुरुवातीला सर्वात मोठी अडचण हिंदी आणि इंग्रजी भाषा समजण्यात होती."

माधव जुलै 2022 मध्ये शाळेत परतला. माधवने १२वीमध्ये हिंदी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, ललित कला आणि शारीरिक शिक्षण हे विषय निवडले.  आणि स्वतःचा अभ्यास सुरू केला. माधवची ही कामगिरी सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सगळीकडे त्याचे कौतुक होत आहे.