#फडणवीस_राजीनामा_द्या : पेपरफुटीवरील कायद्यासाठी विद्यार्थी संघटना आक्रमक

औरंगाबाद येथील एका करिअर अकादमीच्या कार्यालयातून वन विभागाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना उत्तरे पुरविली जात असल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले आहे.

#फडणवीस_राजीनामा_द्या : पेपरफुटीवरील कायद्यासाठी विद्यार्थी संघटना आक्रमक
Twitter War

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

वन विभागाच्या (Forest Department) भरती परीक्षेतील (Recruitment Examination) गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून पेपरफुटीवर कायदा करावा, या मागणीसाठी गुरूवारी (दि. ३)  ट्विटर वॉर ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Dy CM Devendra Fadnavis) यांना लक्ष्य करण्यात आले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे.

औरंगाबाद येथील एका करिअर अकादमीच्या कार्यालयातून वन विभागाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना उत्तरे पुरविली जात असल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले आहे. याप्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे. या घटनेनंतर समन्वय समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. पुढील काही दिवसांत आतापर्यंतची सर्वात मोठी तलाठी भरती परीक्षा होणार आहे. या परीक्षेतही गैरप्रकार होण्याची भीती समन्वय समितीने व्यक्त केली आहे. याबाबत राज्य सरकारवर संबंधित यंत्रणांकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस पावले उचलली जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने दिली होती पोलिसांना माहिती; वन विभागाची भरती परीक्षा थांबविण्याची मागणी

समितीने काही दिवसांपुर्वीच सरळसेवा भरती (Recruitment) परीक्षांमधील पेपरफुटीविरोधातील कठोर कायद्यासाठी ‘ट्विटर वॉर’ (Twitter War) आंदोलन केले होते. त्यानंतर गुरूवारी पुन्हा एकदा समितीकडून सकाळी ११ ते १२ या वेळेत हे आंदोलन केले जाणार आहे. यावेळी #फडणवीस_राजीनामा_द्या आणि #पेपरफुटीवर_कायदा_करा या दोन हॅशटॅगचा वापर प्रामुख्याने केला जाणार आहे.

लाखो रुपयांत वन विभागाचा पेपर फोडण्यात आला. देवेंद्र फडणवीस हे सत्तेत असताना नोकर भरती घोटाळ्यांचा इतिहास राहिला आहे. पेपर फुटीवरील कायद्याबाबत फडणवीसांनी मोघम उत्तर दिले आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. विरोधी पक्ष त्यांचा राजीनामा नाही मागू शकत नाही. तो आपल्या हक्कासाठी आम्हालाच मागवा लागेल. तलाठी भरती पारदर्शक घ्यायची असेल तर पेपरफुटीवर कायदा व्हायला हवा, अशी भूमिका स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने घेतली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD