NCERT चा मोठा निर्णय; शालेय पुस्तकांमध्ये आता ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी २० शिखर परिषदेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या निमंत्रण पत्रिकेवर त्यांच्या पदाचा उल्लेख 'प्रेसिडंट ऑफ इंडिया' ऐवजी 'प्रेसिडंट ऑफ भारत' करण्यात आल्याने वादाला तोंड फुटले.

NCERT चा मोठा निर्णय; शालेय पुस्तकांमध्ये आता ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’
NCERT Books

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मागील काही महिन्यांपासून इंडिया (India) आणि भारत (Bharat) या शब्दांवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (NCERT) पॅनेलने बुधवारी महत्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. यापुढे छापण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांमध्ये इंडिया ऐवजी भारत असे छापण्याचा परिषदेच्या पॅनेलचा प्रस्ताव होता. या प्रस्तावाला बुधवारी पॅनेलने मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता 'एनसीईआरटी'च्या सर्व नव्या पुस्तकांमध्ये इंडिया हा शब्द दिसणार नाही. त्याऐवजी भारत छापले जाणार आहे.

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी २० शिखर परिषदेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या निमंत्रण पत्रिकेवर त्यांच्या पदाचा उल्लेख 'प्रेसिडंट ऑफ इंडिया' ऐवजी 'प्रेसिडंट ऑफ भारत' करण्यात आल्याने वादाला तोंड फुटले. राज्यघटनेतील कलम १ मध्येच ‘इंडिया, म्हणजे भारत, राज्यांचा संघ असेल,’ असे म्हटले आहे.

पुण्यातील कोचिंग क्लासेसवर कारवाई होणार का? दिशाभूल करण्यासाठी चढाओढ

 

भारतीय राज्यघटनेने 'इंडिया' आणि 'भारत' ही दोन्ही देशाची अधिकृत नावे म्हणून मान्य केली आहेत. केंद्र सरकार केवळ 'भारत' हेच नाव अधिकृत करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. परिषदेच्या पॅनेलसमोर काही दिवसांपुर्वीच इंडिया ऐवजी भारत या शब्दाचा उल्लेख पुस्तकांमध्ये करण्याबाबतचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे एनसीईआरटीच्या यापुढे छापण्यात येणाऱ्या सर्व पुस्तकांमध्ये भारत असाच उल्लेख केला जाणार आहे.

 

एनसीईआरटीने २०२१ मध्ये स्थापन केलेल्या पॅनेलमधील एक सदस्य आय सी इसाक यांनी याविषयी बोलताना सांगितले की, भारत हे नाव पुराणकाळापासून आहे. तर इंडिया असा उल्लेख ईस्ट इंडिया कंपनीकडून केला जात होता. त्यामुळे सर्व वर्गांच्या पुस्तकांमध्ये भारत हे नाव छापण्याचा प्रस्ताव आहे. त्याचप्रमाणे प्राचीन इतिहासाऐवजी क्लासिकल इतिहासावर अधिक भर दिला जाणार आहेत. इतिहासाच्या पुस्तकांमध्ये हिंदूच्या विजयाबाबतही अधिक माहिती असेल. सर्व विषयांच्या अभ्यासक्रमात भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश करणे हाही नवीन बदलांचा भाग असल्याचे इसाक यांनी स्पष्ट केले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k