पुण्यातील कोचिंग क्लासेसवर कारवाई होणार का? दिशाभूल करण्यासाठी चढाओढ

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) अध्यक्ष निधी खरे यांनीही माध्यमांशी बोलताना हेच मुद्दे मांडले आहे. क्लासेसकडून योग्य माहिती दिली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची दिशाभूल होते.

पुण्यातील कोचिंग क्लासेसवर कारवाई होणार का? दिशाभूल करण्यासाठी चढाओढ

राजानंद मोरे

आयएएस (IAS), आयपीएस (IPS) व्हायचंय तर मग दिल्ली गाठावीच लागते. तिथे अनेक मातब्बर कोचिंग क्लासवाले (Coaching Classes) मोठ्या-मोठ्या जाहिराती करत हजारो विद्यार्थ्यांना आकर्षित करतात. नेमकं त्यावरच बोट ठेवत केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) अशा क्लासवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अशीच कारवाई पुण्यातील (Pune) क्लासेसवर होणार का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पुणे शहर जसं शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं, तसं आता ते स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे हब म्हणून पाहिले जाते. इथेही विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचा खच पडत असतो.

 

दिल्लीत प्रामुख्याने युपीएससीच्या निकालानंतर अनेक क्लासेसकडून जाहिराती केल्या जातात. आयएएस किंवा आयपीएससाठी पात्र ठरलेला उमेदवार आपल्याच क्लासचा असल्याच्या जाहिरातींचे होर्डिग लावले जातात. संकेतस्थळ,  भित्तीपत्रके, सोशल मीडियातून त्याचा गवगवा केला जातो. पण अनेकदा एकच उमेदवार एकापेक्षा जास्त क्लासेसच्या होर्डिंगवर झळकत असतो. त्यामुळे प्रत्यक्षात पात्र उमेदवारांचा आकडा आणि क्लासवाल्यांकडून करण्यात आलेल्या दाव्यांचा आकडा यामध्ये मोठी तफावत आढळून येते.

IAS प्रशिक्षण केंद्रांची चौकशी; दिशाभूल करणाऱ्या जाहिराती अंगलट 

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) मुख्य आयुक्त निधी खरे यांनीही माध्यमांशी बोलताना हेच मुद्दे मांडले आहे. क्लासेसकडून योग्य माहिती दिली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची दिशाभूल होते. केवळ मुलाखतीच्या सरावासाठी एखाद्या क्लासमध्ये गेलेल्या उमेदवारही आपल्याचा क्लासचा असल्याची जाहिरात केली जाते. अशा जाहिराती दिशाभूल करणाऱ्या आणि अतिरेकी ठरत असल्याचे मत खरे यांनी मांडले होते. या जाहिरातींमुळे ग्राहक संरक्षण कायदा २०१९ मधील कलम २ (२८) चे उल्लंघन होत असल्याने प्राधिकरणाकडून दिल्लीतील २० क्लासेसला नोटीस बजावली आहे. त्यापैकी चार क्लासेसवर दंडात्मक कारवाई केली आहे.

 

दिल्लीमध्ये जी स्थिती आहे, तीच स्थिती पुणे आणि महाराष्ट्रातील क्लासेसचीही आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडून पुण्याला प्राधान्य दिले जाते. अनेक नामांकित खासगी क्लास, सर्व सुविधांयुक्त अभ्यासिकांचे जाळे, खानावळी, पुस्तकांची रेलचेल, वाहतुक व्यवस्था, होस्टेलची उपलब्धता, अभ्यासासाठी पोषक वातावरण, अभ्यास करत असताना हाताला मिळणारे काम अशा विविध कारणांमुळे महाराष्ट्रभरातून लाखो विद्यार्थी पुण्यात येत असतात. इथे आल्यानंतर क्लासमध्ये प्रवेश घेताना त्यांच्याकडून त्यांचा लौकिक तपासला जातो.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, बलात्काराच्या घटनेनंतर कोटामध्ये आता अंमली पदार्थांचे जाळे उघड

 

म्हणजेच, विविध परीक्षांमधून पात्र ठरलेले किती उमेदवार संबंधित क्लासचे आहेत, किती उमेदवारांनी मुलाखतींसाठी संबंधित क्लासला प्राधान्य दिले, कोणत्या क्लासच्या नमुना प्रश्नपत्रिका किंवा सराव परीक्षा उत्तम आहेत आणि प्रमुख बाब म्हणजे शुल्क, अशा गोष्टींकडे पाहिले जाते. इथेच विद्यार्थ्यांची फसगत होताना दिसते. परीक्षांचा निकाल लागल्यानंतर बहुतेक क्लासेसकडून पात्र उमेदवारांच्या सत्काराचे जाहीर कार्यक्रम घेतले जातात. क्लासच्या इमारती, होर्डिंग, संकेतस्थळ, सोशल मीडिया अशा अनेक ठिकाणी जाहिरातींचा भडिमार केला जातो. त्यामध्ये अनेकदा काही उमेदवारांचे चेहरे एकापेक्षा जास्त क्लासेसच्या होर्डिंग्जवर झळकलेले असतात. यावरच ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने आक्षेप घेतला आहे.

 

संबंधित उमेदवाराने आपल्या क्लासमध्ये परीक्षेच्या सराव सत्रासाठी किंवा केवळ मुलाखतीच्या सरावासाठी किंवा नियमित कोर्ससाठी प्रवेश घेतला होता, याबाबत योग्य माहिती क्लासचालकांकडून देणे आवश्यक आहे. पण तसे होताना दिसत नाही. उमेदवारांच्या यशाचा गैरफायदा घेत त्यांच्या नावाचा वापर करून विद्यार्थ्यांना आकर्षित करणे म्हणजे एकप्रकारे त्यांची दिशाभूल, फसवणूक करण्यासारखे आहे. ग्राहक संरक्षण कायद्याची ही पायमल्ली होत असल्याचे ठपका प्राधिकरणाने ठेवला आहे. पुण्यात मागील अनेक वर्षांपासून हे सर्रासपणे सुरू आहे. अशा क्लासेवरही आता कारवाई करून धडा शिकविण्याची वेळ आली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k