धक्कादायक : केंद्रीय शिक्षण संस्थांमधील २० विद्यार्थी दरवर्षी करतात आत्महत्या

आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक प्रकरणे आयआयटी (३९), त्यानंतर एनआयटी (२५), केंद्रीय विद्यापीठे (२५), आयआयएम (४), आयआयएसईआर (३) आणि आयआयआयटी (२) मधील आहेत.

धक्कादायक : केंद्रीय शिक्षण संस्थांमधील २० विद्यार्थी दरवर्षी करतात आत्महत्या

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मागील काही वर्षांपासून विद्यार्थी आत्महत्येचे (Students Suicide) प्रमाण वाढत असल्याने देशभर चिंता व्यक्त केली जात आहे. शालेय विद्यार्थ्यांबरोबच उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थीही विविध कारणांमुळे आपले जीवन संपवत आहेत. त्यातही केंद्रीय शिक्षण संस्थांमधील (Central education Institutes) आत्महत्या कळीचा मुद्दा बनला आहे. मागील पाच वर्षांत या संस्थांमधील ९८ विद्यार्थ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक माहिती केंद्र सरकारकडून (Central Government) देण्यात आली आहे.

केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी नुकतीच राज्यसभेत ही माहिती सादर केली. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, केंद्रीय विद्यापीठे, आयआयटी, आयआयएम, एनआयटी आणि आयआयएसईआरसह उच्च शिक्षण संस्थांमध्ये २०१९ पासून २०२३ पर्यंत गेल्या पाच वर्षांत ९८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सन २०२३ मध्ये आतापर्यंत उच्च शिक्षण संस्थांमध्ये २० विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत.

सोलापूरच्या गुरूजींनी जीवावर उदार होत धुमसत्या मणिपूरमधून परत आणले विद्यार्थी

आकडेवारीनुसार, आत्महत्या केलेल्या ९८ विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक प्रकरणे आयआयटी (३९), त्यानंतर एनआयटी (२५), केंद्रीय विद्यापीठे (२५), आयआयएम (४), आयआयएसईआर (३) आणि आयआयआयटी (२) मधील आहेत. गेल्या चार वर्षांत नोंदवलेल्या आत्महत्यांपैकी सर्वाधिक प्रकरणे अभियांत्रिकी संस्थांतील आहेत, अशी माहिती सरकार  यांनी राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना  दिली. 

दरम्यान, २८ जुलै रोजी  फर्ग्युसन महाविद्यालयातील  बी. एस्सी. अभ्यासक्रमात  तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. तर मागील पाच महिन्यात पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची ही चौथी घटना आहे. आत्महत्येमागे अभ्यासाच्या ताणाव्यतिरिक्त कौटूंबिक व इतरही काही कारणे असल्याचे समोर आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD