लिपिक-टंकलेखकच्या निकालावरून रान पेटणार?

लिपिक-टंकलेखक संवर्गातील तब्बल ७ हजार ३४ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदासाठी विभाग/प्राधिकारीनिहाय कट ऑफ लावण्यात येणार आहे.

लिपिक-टंकलेखकच्या निकालावरून रान पेटणार?
MPSC Examination

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) घेण्यात आलेल्या लिपिक-टंकलेखक पदांसाठीच्या परीक्षेचा निकाल (MPSC Result) पुढील काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता वर्तविली आहे. पण या पदासाठी निकाल लावताना विभाग/प्राधिकारीनिहाय कट ऑफ लावण्यात येणार असल्याचे आयोगाने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये (Students) आधीपासूनच नाराजी आहे. आता विविध संघटनांनी यामध्ये उडी घेतली असून त्यावरून रान पेटण्याची शक्यता आहे. (Demand to set the result of clerk typist exam as cut off of other exams)

लिपिक-टंकलेखक संवर्गातील तब्बल ७ हजार ०३४ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदासाठी विभाग/प्राधिकारीनिहाय कट ऑफ लावण्यात येणार आहे. एकाच विद्यार्थ्यांची विविध प्राधिकरणावर वारंवार निवड होण्याची तसेच हजार विद्यार्थी डावलले जाण्याची भीती विद्यार्थ्यांना आहे. त्यामुळे राज्यस्तरावर एकच कॉमन कट ऑफ लावण्याची मागणी विद्यार्थी करत आङेत. तसे केल्यास प्रत्येक प्राधिकरणनिहाय विद्यार्थ्यांना संधी मिळू शकेल. राज्यसेवा जाहिरातीप्रमाणे एकच कट ऑफ लावत अंतिम निवड यादी बनविताना फक्त उमेदवारांनी विकल्पात दिलेल्या विभागांचा/प्राधिकरणाचा विचार करत, त्यांनी दिलेल्या पर्यायानुसार नियुक्त्या देण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा : ZP Recruitment : आत्महत्या कशाला करायची, जीव वर आलाय का? मंत्रालयातील ऑडिओ क्लिप व्हायरल

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी सांगितले की, लिपिक टंकलेखक पदाची जाहिरात आल्यानंतर आम्ही आयोगाच्या अधिकाऱ्यांशी बोललो होतो. पण त्यांनी नियम बदलण्यास नकार दिला. पुढील महिनाभरात या परीक्षेचा निकाल लागण्याची शक्यता आहे. हा नियम बदलल्यास हजारो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

काँग्रेसचे (सहकार विभाग) सरचिटणीस बळीराम डोळे यांनीही आयोगाकडे याबाबत मागणी केली आहे. आयोगाचा स्पर्धात्मक परीक्षा अंतर्गत होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी पूर्व परीक्षा निकाल १:१२ या गुणोत्तरानुसार जाहीर करण्यात येतो. लिपिक-टंकलेखक साठी आयोगाने हा नियम का बदलला हे उमेदवारांना अनाकलनीय तर आहेच सोबत अन्यायकारक देखील आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे हजारो विद्यार्थी मुख्य परीक्षेपासून वंचित राहणार आहेत. पूर्व मुख्य व टायपिंग स्किल असे 3 टप्पे असणार आहेत. या संवर्गाचा पूर्व परीक्षा निकाल लावताना जो निकष जाहीर केला आहे त्यानुसार जास्त गुण मिळवणारे उमेदवार एकापेक्षा अधिक ठिकाणी पात्र ठरणार आहेत. त्यापैकी काहीजण प्रत्येक नियुक्ती प्राधिकरणात पात्र असणार आहेत. सोबतच हजारो उमेदवार स्पर्धेतून बाहेर पडणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मनात याविषयी तीव्र असंतोष आहे. त्यामुळे नेहमीच्या पूर्व परीक्षेचा निकाल लावतानाचा जो नियम आहे, तोच या संवर्गाला लागू करावा व मुख्य नंतर आपण योग्य तो निकष लावून पुढील टप्प्यासाठी पात्र करावे, अशी मागणी डोळे यांनी केली आहे.

लिपीक-टंकलेखक पूर्व परीक्षा निकाल २०२३ विभागवार निकाल नको, अशी मागणी सुभाष शेळके यांनी ट्विटरवरून केली आहे. एकूण जागांच्या पटित निकाल लावावा. विभागवार निकालानुसार सध्याच्या जागा आणि विभाग पाहता जास्तीत जास्त २० हजार उमेदवारांनी मुख्य परीक्षा दिल्यास आयोगाला टंकलेखन कौशल्यासाठी तीन पट उमेदवार कसे मिळणार, असा सवाल शेळके यांनी उपस्थित केला आहे. काही विद्यार्थ्यांनी निकालाबाबत नाराजी व्यक्त करून आंदोलनाचा इशाराही दिला आहे.