NCERT : महात्मा गांधी हत्या, 'आरएसएस'वरील बंदी अभ्यासक्रमातून हद्दपार

येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०२३-२४) हा भाग पुस्तकांमध्ये नसेल. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे.

NCERT : महात्मा गांधी हत्या, 'आरएसएस'वरील बंदी अभ्यासक्रमातून हद्दपार
NCERT Syllabus, Mahatma Gandhi

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) इयत्ता बारावीच्या राज्यशास्त्र आणि इतिहास विषयाच्या पाठ्यपुस्तकातून महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची हत्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) घातलेली बंदी याविषयी माहिती वगळली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०२३-२४) हा भाग पुस्तकांमध्ये नसेल. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. (NCERT drops texts on Mahatma Gandhi, Hindu-Muslim unity, RSS ban from class 12th syllabus)

उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास काढून टाकण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. त्यानंतर आता NCERT ने आपल्या बारावीच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास सांगणारे धडे वगळला आहे. एवढ्यावरच न थांबता परिषदेने महात्मा गांधींच्या हत्येचा संदर्भही वगळला आहे. बारावीच्या राज्यशास्त्राचे ‘Politics in India since Independence’ हे नवे पुस्तक आणि जुन्या पुस्तकाची तुलना केल्यास महात्मा गांधींच्या हत्येच्या अनुषंगाने असलेली सर्व माहिती काढून टाकण्यात आली आहे.

एनसीईआरटीकडून मागील वर्षी जून महिन्यात विविध पुस्तकांमध्ये बदल केले आहेत. नवीन पुस्तके नुकतीच समोर आल्यानंतर या बदलांवरून वादळ उठले आहे. जुन्या पुस्तकामध्ये म्हटले होते की, पाकिस्तान हा देश जसा मुस्लिमांसाठी बनला तसाच भारतही हिंदूचा देश बनावा, हिंदूंनी फाळणीचा बदला घ्यायला हवा, असे मानणाऱ्या लोकांमध्ये गांधींविषयी द्वेषाची भावना होती. मुस्लिम आणि पाकिस्तानच्या बाजूने काम करण्याचा आरोपही गांधींवर होता. हिंदू आणि मुस्लिमांच्या एकतेच्या गांधींच्या प्रयत्नांनी कट्टरपंथीय भडकले होते. त्यामुळे त्यांच्या हत्येचे अनेक प्रयत्नही झाले. त्यानंतरही गांधींनी आपण असुरक्षित असल्याचे मानण्यास नकार दिला.’

आपल्या प्रार्थनांदरम्यान त्यांनी सर्वांशी भेटणे सुरूच ठेवले. गांधींच्या मृत्यूचा देशातील सामाजिक स्थितीवर मोठा प्रभाव पडला. फाळणीमुळे निर्माण झालेला वाद आणि हिंसा अचानक शांत झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर काही काळ बंदी घालण्यात आली होती. नथुराम गोडसे (Nathuram Godse) याने गांधींची हत्या केल्याचा भागही अभ्यासक्रमातून काढण्यात आला आहे. यावरून नाराजी व्यक्त केली जात असून विरोध होऊ लागला आहे.

एनसीईआरटीकडून मुघलांविषयीची माहिती वगळण्यात आली आहे. या भागामध्ये १६व्या आणि १७व्या शतकातील मुघल साम्राज्याच्या इतिहासाचा समावेश आहे. ‘थीम्स ऑफ इंडियन हिस्टरी पार्ट टू’ या पुस्तकातील हा भाग वगळण्यात आला आहे. एनसीईआरटीने मात्र मोठा बदल करण्यात आला नसल्याचा दावा केला आहे. ओव्हरलॅपिंग आणि असंबध्द माहिती असल्याचे कारण देण्यात आले आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांवर मोठा ताण होता. हा ताण कमी करण्यासाठी अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. त्यासाठी सर्व प्रक्रिया नियमाप्रमाणे केल्याचा दावाही परिषदेने केला आहे.