पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रश्नपेढी करा तयार; परीक्षा परिषदेचे तज्ज्ञांना आवाहन

परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी याबाबत आवाहन केले आहे. राज्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्याची योजना राबविली जाते.

पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रश्नपेढी करा तयार; परीक्षा परिषदेचे तज्ज्ञांना आवाहन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8वी) करीता प्रश्नपेढी तयार करण्याचे काम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (MSCE) हाती घेते आहे. त्यासाठी राज्यातील शिक्षक (Teachers') अथवा इतर कोणत्याही व्यक्तीस सदर परीक्षेच्या अनुषंगाने विषयनिहाय, घटकनिहाय दर्जेदार प्रश्नांची निर्मिती करता येईल. त्यांनी पाठविलेल्या निवडक प्रश्नांमधून प्रश्नपेढी तयार केली जाणार आहे. (5th and 8th Scholarship)

 

परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी याबाबत आवाहन केले आहे. राज्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्याची योजना राबविली जाते. परिषदेमार्फत शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार विषयनिहाय, घटकनिहाय प्रश्नपेढी तयार करावयाचे नियोजन आहे. राज्यातील शिक्षक अथवा इतर कोणत्याही व्यक्तीस सदर परीक्षेच्या अनुषंगाने विषयनिहाय, घटकनिहाय दर्जेदार प्रश्नांची निर्मिती करता येईल. यानिमित्ताने राज्यातील प्रतिभावान, अनुभवी शिक्षक, सेवानिवृत्त अधिकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच सदर विषयातील इतरही तज्ज्ञ व्यक्तींना आपले कौशल्य दाखवण्याची संधी खुली होत आहे.

...तर शाळा दत्तक योजना कागदावरच राहील !

 

परिषदेकडे असे पाठवा प्रश्न -

 

- प्राश्निकाने प्रथम https://www.mscepune.in/ या परिषदेच्या संकेतस्थळावर स्वतःची माहिती भरून नोंदणी करावी.

- नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त लॉगीन आयडी व पासवर्ड वापरून लॉगीन करावे.

- प्रश्नपेढी निर्मिती या मथळ्याखालील शिष्यवृत्ती परीक्षा हा पर्याय निवडून योग्य तो इयत्ता / माध्यम / विषय / घटक/ उपघटक निवडावा. प्रश्न केवळ शिष्यवृत्तीच्या नेमून दिलेल्या घटकावरच आधारित असावा. 

 - आपण निर्मिती केलेला प्रश्न, त्याचे चार पर्याय, त्यापैकी उत्तराचा योग्य पर्याय क्रमांक, उत्तराचे स्पष्टीकरण व त्याविषयीचे संदर्भ आणि आधार इत्यादी सर्व माहिती नोंदवावी, सदर माहिती आपण स्वतः टंकलिखीत करून अथवा कागदावर प्रत्यक्ष लिहून तो PDF स्वरूपात अपलोड करावे. तशी सुविधा संगणक सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 - प्रश्न मराठीमध्ये टंकलिखीत करताना Mangal किंवा Unicode फॉन्ट वापरावा.

- ही प्रक्रीया पूर्ण झाल्यावर Submit या बटनावर क्लिक करून आपला प्रश्न Submit करता येईल.

 

अशा प्रकारे आपण कोणत्याही विषयाचे असंख्य प्रश्न अपलोड करू शकता. आपण शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रश्न निर्मिती करत असल्याने प्रश्नाचा दर्जा, अचूकता, सप्रमाणता, निःसंधिग्धता, काठीण्यपातळी व शुध्दलेखन याबाबतची दक्षता घेणे आवश्यक आहे. प्राप्त प्रश्नांचे मूल्यमापन करून दर्जेदार प्रश्ननिर्मिती करणान्या प्राश्निकांची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अधिकृत प्राश्निक म्हणून निवड करण्यात येईल. या नावीन्यपूर्ण उपक्रमात जास्तीत जास्त तज्ज्ञ प्राश्निकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j