MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मध्ये गैरव्यवहार? चर्चांना उधाण, विद्यार्थी अस्वस्थ

भाजपचे आमदार अभिमन्यु पवार यांनीही या परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी आयोगाकडे केली आहे.

MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मध्ये गैरव्यवहार? चर्चांना उधाण, विद्यार्थी अस्वस्थ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) यावर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ (State Service Mains Exam 2022) मध्ये गैरव्यवहार झाल्याची चर्चांना उधाण आले आहे. या परिक्षाचा निकाल नऊ महिने उलटल्यानंतरही आयोगाकडून जाहीर केला जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. काही जणांनी सोशल मीडियामध्ये गैरव्यवहाराबाबतच्या पोस्ट शेअर केल्या असून विद्यार्थ्यांमध्येही याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळेच निकालाला विलंब होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

 

पुणे शहर व जिल्हा इंटकचे जिल्हाध्यक्ष बळीराम डोळे यांनी दोन दिवसांपुर्वीच याबाबतचे ट्विट केले आहे. यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या descriptive paper checking मध्ये गैरव्यवहार झाल्याची अत्यंत विश्वसनीय माहिती आहे. एमपीएससीचे अध्यक्ष महोदय, निवृत्तीला दोन दिवस बाकी असताना आपले यावर काय स्पष्टीकरण आहे? गोरगरीब उमेदवारांच्या भवितव्याशी नेमकं कोण खेळत आहे?, असे प्रश्न डोळे यांनी उपस्थित केले आहेत.

किती दिवस फक्त ट्विट-ट्विट खेळणार आहात? विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर रोहित पवारही झाले आक्रमक

 

त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांनीही ‘एज्युवार्ता’शी बोलताना याबाबत शंका व्यक्त केली आहे. परीक्षा होऊनही नऊ महिने उलटले आहेत. तीन-चार महिन्यांत निकाल येणे अपेक्षित होते. पुर्व परीक्षा २०२३ चा निकाल चार महिन्यांत जाहीर करण्यात आला. पण अजूनही जानेवारीत झालेल्या मुख्य परीक्षाचा निकाल नाही. त्यामुळे या परीक्षेत गैरव्यवहार होत असल्याच्या शंकेला अधिक बळ मिळत आहे, असे या विद्यार्थ्याने सांगितले. सोशल मीडियातही असे काही मेसेज फिरत असल्याचे त्याने सांगितले.

 

दरम्यान, भाजपचे आमदार अभिमन्यु पवार यांनीही या परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी आयोगाकडे केली आहे. त्यांनी आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांच्या दुरध्वनीवरून याबाबत चर्चा केली होती. परीक्षा झाल्यानंतर सामान्यतः ३ महिन्यांमध्ये निकाल लागतो पण २०२२ ची राज्यसेवा मुख्य परीक्षा होऊन ७ महिने झाले तरी अद्याप निकाल न लागल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नैराश्य असल्याची स्पष्ट कल्पना त्यांना दिली. निकालासंदर्भात काही अडचणी होत्या पण त्या आता दूर झाल्या असून लवकरच निकाल लागेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिल्याची माहिती पवार यांनी ट्विटमध्ये दिली होती.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j