कॉलेजनंतर चहाच्या टपरीवर वडिलांना मदत करणारा मंगेश झाला साहेब!

मंगेश मुळचा अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी गावचा. गावातच दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. तर बारावीपर्यंतचे शिक्षण संगमनेरमध्ये. पुढे उच्च शिक्षणासाठी पुण्यात आला.

कॉलेजनंतर चहाच्या टपरीवर वडिलांना मदत करणारा मंगेश झाला साहेब!
Mangesh Khilari

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शाळा-कॉलेज संपल्यानंतर वडिलांना चहाच्या टपरीवर मदत करणारा मंगेश खिलारी (Mangesh Khilari) साहेब झाला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) जाहीर केलेल्या निकालात मंगेशला ३९६ वी रँक मिळाली आहे. घरची बेताची आर्थिक स्थिती असूनही आई-वडिलांनी दिलेल्या खंबीर पाठबळामुळे हे यश मिळाल्याचे मंगेशने सांगितले. उच्च शिक्षण घेत असतानाच चार वर्षांपासून मंगेश पुण्यात (Pune) या परीक्षेची तयारी करत होता.

मंगेश मुळचा अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी गावचा. गावातच दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. तर बारावीपर्यंतचे शिक्षण संगमनेरमध्ये. पुढे उच्च शिक्षणासाठी पुण्यात आला. राज्यशास्त्र विषयातून पदवीचे शिक्षण घेत असतानाच त्याने युपीएससीचा अभ्यास सुरू केला. गुणवंत विद्यार्थी म्हणून शाळेपासूनच त्याचे कौतूक होत होते. त्यातूनच त्याला युपीएससी करण्याची प्रेरणा मिळाली.

हेही वाचा : जिद्द अन् चिकाटी काय असते ते सागरने दाखवून दिले! पाचव्या प्रयत्नात यशाला गवसणी..

घरची परिस्थिती बेताची असल्याने मंगेशने व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे न वळता कला शाखेत प्रवेश घेऊन युपीएससीची तयारी सुरू केली. गावाकडे जेमतेम ३ ते ४ एकर शेती. त्यासोबत वडीलांचे चहाचे दुकान. तर आई घरकाम सांभाळून विडी वळण्याचे काम करते. त्यामुळे मंगेश गावाकडे असताना शाळा-कॉलेज संपल्यानंतर चहाच्या टपरीवर वडिलांना मदत करायचा.

हेही वाचा : UPSC Result : देशातील शंभर टॉपर्सची नावे पहा एका क्लिकवर, मुलींनी मारली बाजी

पुण्यात मंगेशने युपीएससीची जोमाने तयारी सुरू करत तिसऱ्या प्रय़त्नात यश मिळविले आहे. यापूर्वी तो दोनवेळा मुलाखतीपर्यंत पोहचला होता. मागच्यावेळी तर केवळ तीन गुणांनी त्याची रँक गेली होती. पण खचून न जाता तो अभ्यास करत राहिला. दररोज १५ ते १६ तास अभ्यास केला. तसेच सोशल मीडियाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे यश मिळाल्याचे मंगेशने सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2