मनविसेच्या धडक मोर्चाचा विद्यापीठ प्रशासनाने घेतला धसका; कुलसचिवांचे अमित ठाकरेंना पत्र

मनविसेच्या धडक मोर्चाचा विद्यापीठ प्रशासनाने घेतला धसका;  कुलसचिवांचे अमित ठाकरेंना पत्र

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र नाव निर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray)  यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपुर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर (Savitribai Phule Pune University) 'मनविसे'कडून (MNVS) धडक मोर्चा (Dhadak Morcha) काढण्यात आला होता. त्याचा विद्यापीठ प्रशासने चांगलाच धसका घेतल्याचे दिसत  आहे. विद्यापीठ प्रशासनाने (University Administration) अमित ठाकरे यांना सकारात्मक पत्र पाठवले आहे. त्यामुळे येत्या काहीच दिवसांत विद्यार्थांचे सर्व प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

अमित ठाकरे यांनी कुलगुरू आणि प्रशासनाशी चर्चा करताना पुणे विद्यापीठ कॅम्पस आणि संलग्न महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांशी संबंधित अनेक प्रश्न केले आहेत. विद्यापीठाचे  कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नेते अमित ठाकरे यांना लेखी उत्तर पाठवले आहे. मनविसेच्या धडक मोर्चाने उपस्थित केलेल्या अनेक मुद्द्यांची गंभीर दखल घेऊन विद्यापीठाने अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत हा पत्रव्यवहार केला आहे. 

मराठी भाषा भवन येत्या १ मे पासून सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. चार ते पाच वर्षांमध्ये उपलब्ध वसतिगृहांची क्षमता दुपटीपेक्षा अधिक वाढवण्यासाठी विद्यापीठ कालबद्ध आहे. पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रक, ट्रान्सक्रिप्ट, दुय्यम गुणपत्रक इत्यादी कागदपत्रे मिळवण्यासाठी संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली  आहे. विद्यापीठाच्या नाशिक व अहमदनगर उपकेंद्रांमार्फत विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी कार्यान्वित करण्यात येतील. 'विशाखा समिती' स्थापन करण्यासंदर्भात महाविद्यालयांना स्मरणपत्रे पाठवली आहेत. पुणे विद्यपीठाच्या भोजनगृहामधील भोजनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विशेष यंत्रणा राबवित आहोत. ड्रग्जच्या मुद्यासंदर्भात विद्यापीठाशी संलग्न प्रत्येक महाविद्यालयात जागृतीचे कार्यक्रम आणि समुपदेशाचे उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुणे विद्यापीठ प्रशासनाने मनविसेला दिलेला प्रत्येक शब्द पाळला जाईल आणि आता यापुढे विद्यार्थ्यांवरील अन्याय रोखण्याच्या दिशेने तत्परतेने पावले उचलली जातील, असे विद्यापाठीने अमित ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे.