SPPU News : प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी कॅरीऑन पद्धत सुरू करण्याची मागणी

युवासेनेचे राज्य सहसचिव कल्पेश यादव यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर यांना निवेदन दिले आहे.

SPPU News : प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी कॅरीऑन पद्धत सुरू करण्याची मागणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

काही महाविद्यायातील व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी कॅरीऑन (Carry On System) पद्धतीचा अवलंब करून त्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी विनंती युवासेनेकडे (Yuva Sena) केली आहे. त्यानुसार युवा सेनेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडेही (SPPU) ही मागणी केली आहे.

युवासेनेचे राज्य सहसचिव कल्पेश यादव यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर यांना निवेदन दिले आहे. या मागणीचा विद्यार्थ्यांना पळवाटा निर्माण करणे असा उद्देश नसून विद्यार्थी मूळ प्रवाहातून बाहेर पडू नये, तसेच शैक्षणिक दर्जा खालावू नये याचसाठी ही मागणी केली असल्याचे असल्याचे यादव यांनी सांगितले.

शरद पवारांच्या संस्थेतील महाविद्यालयाचे अजित पवार अध्यक्ष असलेल्या संस्थेकडे हस्तांतरण

यादव म्हणाले, ही पद्धत लागू करताना काही ठराविक अटी व शर्ती ठेवून ती लागू करण्यात यावी, तरच यातून पळवाट निर्माण होणार नाही. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील सर्व विभाग प्रमुखांनी याबाबत चर्चा करून प्रस्ताव सादर करण्याची विनंती आम्ही केली आहे. विद्यार्थी जेव्हा एका शैक्षणिक प्रवाहातून बाहेर पडतो, तेव्हा तो वाम मार्गाला लागण्यास वेळ लागत नाही. भविष्यात देशात एक उत्कृष्ट इंजिनिअर होईल, असा विद्यार्थी उद्या आरोपी होतो. याला बऱ्याचदा कारणीभूत व्यवस्था असते. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या मागणीचा आपण गांभीर्याने विचार करावा.

प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना तृतीय तसेच अंतिम वर्षातील प्रवेशासाठी अडचण येत असून या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी कॅरीऑन पद्धत लागू करण्यासाठीचा धोरणात्मक निर्णय होणे गरजेचे आहे. सर्व विभागाच्या अधिष्ठातांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करत कॅरीऑन बाबतचा प्रस्ताव तातडीने विद्यापीठ अधिकार मंडळासमोर सादर करावा. तसेच याचा पाठपुरावा करून ही पद्धत तातडीने अंमलात आणावी, अशी मागणी केल्याचे यादव यांनी सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo