अजित पवारांच्या सुचनेकडे ‘एमआयडीसी’चा कानाडोळा; विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुली जोमात

अजित पवार यांनी विविध विभागांतील अधिकाऱ्यांच्या बैठकीत स्वतंत्र शुल्क न आकारण्याच्या सुचना दिल्या होत्या.

अजित पवारांच्या सुचनेकडे ‘एमआयडीसी’चा कानाडोळा; विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुली जोमात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य सरकारच्या (Maharashtra Government) विविध विभागांच्या पदभरती प्रक्रियेत (Recruitment) एकाच जाहिरातीतील विविध पदांसाठी स्वतंत्र शुल्क आकारू नये, अशा सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Dy CM Ajit Pawar) यांनी सर्व विभागांना दिल्या होत्या. पण या सुचनेकडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) कानाडोळा केला आहे. महामंडळाने रविवारी (दि. १३) विविध ३४ पदांसाठी जाहिरात प्रसिध्द केली असून प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे.

परीक्षा शुल्कावरून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही (Maharashtra Assembly) चर्चा झाली होती. त्यानंतर चार दिवसांपुर्वीच अजित पवार यांनी विविध विभागांतील अधिकाऱ्यांच्या बैठकीत स्वतंत्र शुल्क न आकारण्याच्या सुचना दिल्या होत्या. राज्य शासनाच्या काही विभागांनी काढलेल्या पदभरतीच्या जाहिरातीत प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारल्याचे समोर आले आहे. ही बाब परीक्षार्थींवर अन्याय करणारी असून एका जाहिरातीतील सर्व पदांसाठी एकच शुल्क आकारण्यात यावे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती अजित पवार यांनी ट्विटद्वारे दिली होती.

विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा; एका जाहिरातीतील सर्व पदांसाठी एकच शुल्क

आमदार रोहित पवार यांनीही या ट्विटनंतर अजित पवार यांचे आभार मानले होते. पण अजित पवारांची ही सुचना हवेत विरली आहे. ‘एमआयडीसी’ने या सुचनेकडे दुर्लक्ष करत भरतीची जाहिरात प्रसिध्द केली आहे. विविध ३४ पदांच्या ८०२ जागा भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्जासाठी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना एक हजार रुपये तर मागासवर्गीय, दिव्यांग, अनाथ विद्यार्थ्यांना ९०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. उमेदवारांना एकापेक्षा अधिक पंदासाठी अर्ज करायचा असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील, असे जाहिरातीमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

सर्व पदांसाठी एकच परीक्षा होत असल्याने प्रत्येक पदासाठी वेगळे परीक्षा शुल्क असू नये, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्यावर विधीमंडळाच्या अधिवेशनातही चर्चा झाली होती. त्यानंतर पवारांनी विभागांना सुचना दिल्या होत्या. पण उपमुख्यमंत्र्यांच्या सुचनेला विभागांकडून बगल दिली जात आहे. याचा फटका थेट विद्यार्थ्यांना बसणार असून त्यांना परीक्षेसाठी खिसा रिकामा करावा लागणार असल्याने नाराजी निर्माण झाली आहे. अनेक विद्यार्थी विविध पदांसाठी अर्ज भरतात.

जिल्हाधिकाऱ्यांची विद्यापीठाला तंबी; समान संधी केंद्र नसलेल्या महाविद्यालयांची संलग्नता रद्द करा!

दरम्यान, एमआयडीसीच्या पदभरतीसाठी इच्छुकांना www.midcindia.org ऑनलाईन पध्दतीने २ ते २५ सप्टेंबरदरम्यान अर्ज भरता येणार आहेत. तर परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र परीक्षेच्या सात दिवस आधी उपलब्ध करून दिली जाईल. परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रामधये नमूद केले जाईल.

गट 'अ', 'ब' आणि 'क' संवर्गातील पदे

कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), वीजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२), सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक व वीजतंत्री - श्रेणी २ (ऑटोमोबाईल).

 शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo