बार्टी, सारथी, महाज्योती परीक्षेतील गोंधळावर आज महत्त्वपूर्ण बैठक ; निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

परीक्षेसाठी 2019 मध्ये घेण्यात आलेल्या सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका जशीच्या तशी वापरली गेली.

बार्टी, सारथी, महाज्योती परीक्षेतील गोंधळावर आज महत्त्वपूर्ण बैठक ; निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
Barti ,sarthi, Mahajyoti

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

बार्टी, सारथी, महाज्योती (Barti ,sarthi, Mahajyoti) या संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी २०१९ चा सेट परीक्षेचा पेपर (2019 set exam paper) कोणताही बदल न करता वापरला गेल्याने गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करून सरसकट फेलोशिप देण्याची मागणी केली. मात्र, या सर्व गोंधळाबाबत मंगळवारी (दि.२६) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) महत्वपूर्ण बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत काय निर्णय होणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

राज्य शासनाने बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून  दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. या परीक्षेची जबाबदारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडे देण्यात आली. मात्र,या परीक्षेसाठी 2019 मध्ये घेण्यात आलेल्या सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका जशीच्या तशी वापरली गेली. त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. तसेच शासन फेलोशिप देण्याबाबत गंभीर नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला.त्यामुळे पीएचडी धारक विद्यार्थ्यांना बार्टी, सारथी ,महाज्योती या संस्थांकडून सरसकट फेलोशिप द्यावी,या मागणीने पुन्हा जोर धरला आहे.

हेही वाचा : बार्टी, सारथी आणि महाज्योती फेलोशीप परीक्षेत गोंधळ; परीक्षा रद्द करण्याची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या बैठकीस बार्टीचे महासंचालक सुनील वारे, सारथी व महाज्योतीचे प्रमुख अधिकारी तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत परीक्षेदरम्यान घडलेल्या गोंधळाबाबत चर्चा केली जाणार आहे.  त्यानंतर परीक्षेबाबत काय निर्णय घ्यायचा हे निश्चित केले जाणार आहे. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार की , दिलेल्या परीक्षेच्या आधारे  मेरिट लिस्ट काढून प्रत्येकी 200 विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाणार यावर या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.