एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर; 37 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण

राज्यातील ३७ विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल मिळाले आहेत. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यातील १७ आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित यामधील २० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर; 37 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Test) कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२४-२५  (Academic year 2024-25) साठी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषि आणि औषधनिर्माणशास्त्र या  अभ्यासक्रम प्रवेशासाठी (Engineering, Technology, Agriculture and Pharmaceutical Courses Entrance Test) घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेची निकाल (Result Declered) अखेर जाहीर करण्यात आला. त्यामध्ये राज्यातील ३७ विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल मिळाले आहेत. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (PCB) यातील १७ आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) यामधील २० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.      

एमएचटी सीईटी परीक्षा २२ एप्रिल ते १६ मे या कालावधीत घेण्यात आली होती. राज्यभरातील १५९ केंद्रांवर ही परीक्षा झाली. त्यातील १६ परीक्षा केंद्रे राज्याबाहेरील होती. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने घेतलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्यचा (JEE MENS) निकाल या पूर्वीच जाहीर झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष एमएचटी-सीईटीच्या निकालाकडे लागले होते.

सीईटी सेलने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ७ लाख २५ हजार ५२ विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ७५ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) गटासाठी ३ लाख १४ हजार ६७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील २ लाख ९५ हजार ५७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) गटासाठी नोंदणी केलेल्या ४ लाख १० हजार ३७७ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ९५ हजार ८०० विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले होते.

दरम्यान, पीसीबी आणि पीसीएम गटातील मिळून एकूण ३७ विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल मिळाले आहेत. एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता अभियांत्रिकी, कृषि, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.