MPSC कडून 2021 च्या पीएसआय पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

अजय कळसकर यांनी 329.50 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला असून बाळासाहेब दराडे यांनी 326.50 गुण मिळवत द्वितीय तर सागर भाबड आणि रशीद शेख यांनी 323 गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला आहे.

MPSC कडून 2021 च्या पीएसआय पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC)महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब  मुख्य परीक्षा 2021 - पोलीस उपनिरीक्षक (PSI)संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (General Merit List)जाहीर करण्यात आली आहे. त्यात अजय कळसकर यांनी 329.50 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला असून बाळासाहेब दराडे यांनी 326.50 गुण मिळवत द्वितीय तर सागर भाबड आणि रशीद शेख यांनी 323 गुण मिळवत संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकावला आहे. आयोगातर्फे 585 उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा २०२१ या परीक्षेतील पोलीस उप निरीक्षक संवर्गाच्या अनाथ आरक्षणासंदर्भात मूळ अर्ज क्रमांक ३९६/२०२४ प्रकरणावरील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई यांच्या दिनांक ५ एप्रिल, २०२४ रोजीच्या आदेशानुसार अनाथांची २ पदे प्रस्तुत जाहिरातीमध्ये समाविष्ट करून एकूण ३७८ पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये/शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो.

 खेळाडू प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची क्रीडाविषयक कागदपत्रे प्राधिकृत क्रीडा अधिका-यांनी तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यांचा खेळाडू प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आला आहे व त्यांचा तात्पुरत्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या गुणवत्ता यादीत न्यायालयात / मा. न्यायाधिकरणामध्ये दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे,असे आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.