ना खचला, ना हरला! ‘एमपीएससी’सह व्यवसायातील अपयश अन् अपघातानंतरही अभिषेकने सर केले यशाचे शिखर

अभिषेक यांनी २०१७ मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण करून मी MPSC परीक्षेची तयारी सुरु केली. २०१८ मध्ये पूर्व परीक्षा पास झाले. पण मैदानी चाचणीचा सराव करताना एक अपघात झाला.

ना खचला, ना हरला! ‘एमपीएससी’सह व्यवसायातील अपयश अन् अपघातानंतरही अभिषेकने सर केले यशाचे शिखर
Abhishek Parvate with his team

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

PSI व्हायचे होते, MPSC ची पुर्व परीक्षाही पास झालो. पण  मैदानी  चाचणी देत असताना झालेल्या अपघातात खुबा सरकला. PSI होण्याचे स्वप्न भंगले. पुढे व्यवसाय करण्याची तयारी केली. कोरोना (Covid 19) आणि बाकीच्या अडथळ्यांनी त्यामध्येही अपयश आले. अखेर अभिषेक पर्वते (Abhishek Parvate) यांनी  त्यांच्या अपयशावर मात केली. सध्या ते  पुण्यातील एक यशस्वी उद्योजक (Businessman) बनले आहेत. पुण्यात  त्यांचे  चार व्यवसाय सुरु आहेत. (Success Story)

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून आलेले अभिषेक पर्वते त्यांच्या यशाच्या वाटचाली बद्दल 'एज्युवार्ता'शी बोलत होते. पर्वते  म्हणाले, माझे वडील एसटी  महामंडळामध्ये कंडक्टर या पदावर काम करत होते. २०१७ मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण करून मी MPSC परीक्षेची तयारी सुरु केली. मला PSI  व्हायचे होते. २०१८ मध्ये मी पूर्व परीक्षा पास झालो.  पण मैदानी चाचणीचा सराव करताना माझा एक अपघात झाला. ज्यामध्ये  खुबा सरकला. डॉक्टरांनी मला एक शस्त्रक्रिया करण्यास सांगितले आणि  यापुढे धावता येणार नसल्याचे सांगितले. माझे  PSI होण्याचे स्वप्न भंगले. मी तिथेच स्पर्धा परीक्षेचा नाद सोडला.

होय, आम्ही MPSC कर! सुशील काटकरांचा वडापावची गाडी ते हॉटेलपर्यंतचा प्रवास व्हाया MPSC...

मित्रांच्या सल्ल्याने मी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले. त्यासाठी मित्राने मला आर्थिक मदतही केली. २६ जून २०१९ रोजी पुण्यातील सदाशिव पेठेत 'न्यु लूक मेन्स पार्लर' हे कटिंगचे दुकान सुरू केले. पण कोरोनामुळे हा व्यवसायही बंद करावा लागला. लॉकडाऊन नंतर पुन्हा व्यवसाय सुरु केला, पण त्यात अपयश आले, शेवटी ते दुकानही बंद करावे लागल्याचे अभिषेक यांनी सांगितले. या अपयशामुळे अभिषेक निराश झाले होते. पुरते खचून गेले होते. त्यांना या अपयशामुळे अपमानही सहन करावा लागला. पण ते हरले नाही. नव्या उमेदीने कामाला लागले.

'प्लॅन ए' फसला तरी उमेश घाडगे मागे हटले नाहीत; MPSC च्या विद्यार्थ्यांना मदत करत बनले यशस्वी उद्योजक

यशाच्या या प्रवासाविषयी सांगताना ते म्हणाले, पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभे राहण्याची आस निर्माण झाली. पुन्हा मित्र मदतीला धावून आले. एका व्यक्तीला हाताशी घेऊन छोटेसे सलून सुरु केले. इथून माझ्या यशस्वी वाटचालीला सुरुवात झाली. आज पुण्यात दोन हेअर कटिंग सलून आहेत. एक डिझायनर स्टुडिओ आहे. तर  टूर्स अँड ट्रॅव्हल्सला  २ गाड्या आहेत. याशिवाय गांजवे चौक येथे 'हॉटेल खान्देश सेंट्रल' नावाचे हॉटेल आहे.  माझे आणि माझ्या वडिलांचे संपूर्ण कर्ज फेडले. आज माझ्याकडे १५ लोक नोकरी करत आहेत.

"१९ महिन्यात हा टप्पा पार केला असला तरी त्यामागे २ वर्ष केलेली मेहनत आहे. अपयश पाहिले आहे. आर्थिक नुकसान सोसले आहे. अपमान झाले आहेत. जिद्द ठेवून, सातत्य ठेवून संघर्ष करून  आणि तुषार गोविंदवार, विशाल दीक्षित आणि वृषाली गायकवाड या मित्रांच्या मदतीने  हे यश मिळविलेले आहे," असे अभिषेक आता अभिमानाने सांगत आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo