शरद पवारांचा इशारा : प्रागतिक विचारांच्या संस्था स्वस्थ बसणार नाहीत, मनुस्मृती श्लोकावरील वाद

राज्य अभ्यासक्रम आराखाड्यात मनाचे श्लोक आणि भारतीय मुल्यांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीतील श्लोकाचा वापर करण्यात येणार आला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

शरद पवारांचा इशारा : प्रागतिक विचारांच्या संस्था स्वस्थ बसणार नाहीत, मनुस्मृती श्लोकावरील वाद

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (National Education Policy) एससीईआरटीने (SCERT) इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रमाचा आराखडा जाहीर केला आहे. या आराखड्यात मनाचे श्लोक यांचा संदर्भ दिला आहे. तसेच भारतीय मुल्यांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीतील (Manusmriti)श्लोकाचा संदर्भ दिला आहे.मात्र त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. परंतु, प्रागतिक विचारांच्या संस्था स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस (sp) पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली आहे. 

राज्य अभ्यासक्रम आराखाड्याच्या मसूद्यामध्ये मनुस्मृती आणि मनाचे श्लोक यांचा संदर्भ दिल्याची माहिती नुकतीच समोर आली.त्यावर भाष्य करताना राष्ट्रवादी कॉग्रेस (एसपी) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, यावरुन राज्य सरकारची संविधानाच्या प्रति काय मानसिकता आहे, हे लक्षात येते. त्यामुळे सामाजिक संस्थांनी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. मुलांच्या डोक्यात नेमकं काय घालण्याचा प्रयत्न सुरु आहे, हे कळत नाही. प्रागतिक विचाराच्या लोकांनी लक्ष घातले पाहिजे तसेच शैक्षणिक क्षेत्रातील जाणकरांनी यावर भूमिका घेतलीच पाहिजे, असे आवाहनही शरद पवार यांनी केले आहे. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, 'एससीईआरटी'ने राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागविण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. सत्ताधाऱ्यांची संविधानाच्या प्रति काय मानसिकता आहे, याच्यावरून हे लक्षात येते, असा हल्ला चढवत जर राज्य शासन असे पाऊल उचलत असेल तर प्रागतिक विचारांच्या संस्था स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. त्याचवेळी शैक्षणिक क्षेत्रातील जाणकरांनी यावर भूमिका घेतलीच पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

नव्या शैक्षणिक धोरणात देशातील पारंपरिक, प्राचीन ज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी भारतीय ज्ञानप्रणाली या घटकाचा समावेश करण्यात आला आहे. त्याप्रमाणे भगवद्गीतेतील ज्ञानयोग, आत्मयोग, भक्तियोग आणि कर्मयोग यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात येत आहे. भारतीय ऋषींची दीनचर्या कशी होती, आहार कसा होता, गुरूशिष्य परंपरा कशी होती, याची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्याचा मानस शासनाचा दिसून येत आहे, त्यावर आता राजकीय प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.