शिकण्याची दुर्दम्य इच्छा! बारामतीतील आजी-नातीसह साताऱ्यातील आजींची शिक्षण मंत्रालयाकडून दखल
देशभरात मागील वर्षापासून नव भारत साक्षरता अभियान 'सर्वांसाठी शिक्षण ' या नावाने सुरू झाले आहे. महाराष्ट्रात त्याची सुरुवात चालू वर्षी दि. ८ सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिनी करण्यात आली.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
लहानपणी शाळेत नाव दाखल करूनही दारिद्र्यामुळे आणि दोन लहान भावंडांचा सांभाळ करण्यासाठी लगेचच शाळा (School Education) सोडून द्यावी लागल्याने निरक्षर राहिलेल्या बारामती (Baramati) येथील ७२ वर्षीय सुशीला क्षीरसागर (Sushila Kshirsagar) आपल्या नातीकडून अक्षरे गिरवू लागल्या आहेत. मणक्याच्या आजाराने त्रस्त असतानाही शिकण्याची दुर्दम्य इच्छा त्यांच्यात आहे. निरक्षर आणि त्यांना शिकवू इच्छिणाऱ्या स्वयंसेवकांसाठी प्रेरणादायी असलेल्या त्यांच्या छायाचित्राची केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने (Education Ministry) दखल घेतली आहे. केंद्रीय सचिव संजय कुमार आणि अवर सचिव प्रदीप हेडाऊ यांनी याची प्रशंसा तर केलीच,तसेच नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या (Nav Bharat Saaksharta Karyakram) 'उल्लास' (ULLAS) या फेसबुक पेजवर हे छायाचित्र पोस्टही केले आहे. त्याचप्रमाणे सातारा येथील बबई मस्कर यांचाही फोटो सर्वांची मनं जिंकत आहे.
देशभरात मागील वर्षापासून नव भारत साक्षरता अभियान 'सर्वांसाठी शिक्षण ' या नावाने सुरू झाले आहे. महाराष्ट्रात त्याची सुरुवात चालू वर्षी दि. ८ सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिनी करण्यात आली. पंधरा वर्षे व त्याहून अधिक वयाच्या निरक्षरांच्या साक्षरतेसाठी नवभारत साक्षरता कार्यक्रम सुरू केला आहे. त्यानुसार राज्यभर गावोगावी साक्षरतेचे वर्ग कमी-अधिक संख्येने सुरू झाले आहेत. त्यापूर्वीच सुशीला आजींचे मूलभूत शिक्षण त्यांची नात रुचिता हिने सुरू केले आहे.
केंद्रीय विद्यालयांमध्ये शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठी बातमी; पात्रतेत केला बदल
महाराष्ट्रातील उपक्रमाच्या प्रारंभाची छायाचित्रे व तपशील शालेय शिक्षण विभागाच्या योजना संचालनालयाने केंद्र शासनास सादर केली होती. सातारा येथील ७६ वर्षीय बबई मस्कर महिलेचे साक्षरता वर्गातील पहिल्या दिवसाचे छायाचित्र आणि या दोघी आजींनातींचे छायाचित्र यासह अनेक छायाचित्रे व माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला पाठवण्यात आली होती. यातील दोन्ही छायाचित्रांची दखल केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतली आहे.
बारामती (जि. पुणे) येथील श्रीमती सुशीला गोपीनाथ क्षीरसागर आणि त्यांची नऊ वर्षांची नात रुचिता यांचा हा फोटो प्रेरणादायी ठरत आहे. सुशीला यांचे वय ७२ असून लहानपणी त्यांचे नाव त्यांच्या माहेरी (मुळगाव बोरगाव, तालुका बार्शी) शाळेत दाखल केले असता घरातील दोन लहान भावांना सांभाळण्याची जबाबदारी अंगावर पडल्याने व दारिद्र्यामुळे त्यांना शाळा सोडून द्यावी लागली होती. त्यामुळे त्या निरक्षरच राहिल्या. शिक्षणाचे महत्त्व त्यांना पटले होते. त्यामुळे अतिशय काबाडकष्ट करून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्चशिक्षित केले आणि घराला दारिद्र्यातून बाहेर काढले.
शाळेतील असुविधांमुळे संतापलेल्या विद्यार्थिनींनी फोडली शिक्षणाधिकाऱ्याची गाडी
शिकण्याची त्यांची अपुरी राहिलेली इच्छा आता पूर्ण होऊ शकणार आहे. म्हणजेच नवभारत साक्षरता योजनेमुळे त्यांच्यात शिकण्याची उमेद जागी झाली आहे. परंतु मणक्याच्या आजारामुळे त्या कोणत्याही साक्षरता वर्गात प्रत्यक्ष जाऊ शकत नाहीत. अर्धा-एक तासापेक्षा अधिक त्या बसू शकत नाहीत. मात्र त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती लक्षात घेता त्यांची नात त्यांना किमान मूलभूत शिक्षण देऊ लागली आहे. मागील ऑगस्ट महिन्यापासून त्यांना शिकवण्याचे काम त्यांची नऊ वर्षांची नात रुचिता आनंदाने करत आहे.
दोघीही या अध्ययन अध्यापनाचा आनंद घेत आहेत. शिकणे- शिकवण्यात मग्न असताना त्यांचा नकळत फोटो ज्योती क्षीरसागर यांनी घेतला. त्यांचा हा निरक्षरांसाठी प्रेरणादायी फोटो सोशल मीडिया व इतर माध्यमातून महाराष्ट्रात चांगलाच व्हायरल झाला आहे. नवभारत साक्षरता अभियानात शाळांनी सर्वे करून स्वयंसेवकांच्या मदतीने निरक्षरांना साक्षर करावयाचे. घरातील निरक्षरांना त्यांच्या कुटुंबीयांनी साक्षर करणे अभिप्रेत आहे. कुटुंबात निरक्षर नसतील तर शेजारी असलेल्यांनाही साक्षर करता येऊ शकते.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
eduvarta@gmail.com