निकालास  विलंब झाल्यास कुलगुरुंना जबाबदार धरणार : राज्यपाल रमेश बैस

राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील काही पारंपरिक, कृषि, आरोग्य विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरुंची  बैठक सोमवारी (दि. १५) राजभवन येथे संपन्न झाली, त्यावेळी ते  बोलत होते.

निकालास  विलंब झाल्यास कुलगुरुंना जबाबदार धरणार : राज्यपाल रमेश बैस
Governor Ramesh Bais and SPPU VC Dr. Karbhari Kale

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विद्यापीठांच्या (University) विविध परीक्षांचे निकाल तीस दिवसांत आणि उशिरात उशिरा ४५ दिवसांच्या आत लावण्याचे बंधन असताना देखील बहुसंख्य विद्यापीठे निकाल (University Result) लावण्यास अक्षम्य विलंब करीत आहेत. विद्यापीठांच्या निकालासोबत विद्यार्थ्यांचे भवितव्य निगडित असल्याने सर्व विद्यापीठांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. त्यामुळे यापुढे निकाल लावण्यास विलंब झाल्यास थेट कुलगुरुंना (Vice Chancellor) जबाबदार धरले जाईल,असे  राज्यपाल व कुलपती रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी राज्यातील कुलगुरुंना स्पष्ट सांगितले.  

राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील काही पारंपरिक, कृषि, आरोग्य विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरुंची  बैठक सोमवारी (दि. १५) राजभवन येथे संपन्न झाली, त्यावेळी ते  बोलत होते. या बैठकीस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (SPPU) प्रभारी कुलगुरु डॉ.कारभारी काळे (Dr. Karbhari kale),मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ.दिगंबर शिर्के, एसएनडीटी महिला  विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ उज्वला चक्रदेव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु ले. जन. (नि) माधुरी कानिटकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.पी.जी पाटील, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.संजय सावंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.राजनीश कामत आदी उपस्थित होते.

हेही वाचा : MPSC Exam : टंकलेखन कौशल्य चाचणी पुन्हा होणार; आयोगाचा मोठा निर्णय

वेगवेगळ्या परीक्षांचे निकाल वेळेवर न लागल्यामुळे सामायिक शैक्षणिक वेळापत्रक चुकते. त्यामुळे निकाल वेळेवर लावले पाहिजे.तसेच गुणपत्रिकांचे देखील वितरण वेळेवर झाले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. अनेकदा इतर विद्यापीठांमध्ये किंवा परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची किंवा तात्पुरत्या पदवी प्रमाणपत्राची गरज असते. विद्यापीठांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे अनेक विद्यार्थी राज्यपाल कार्यालयकडे पत्रव्यवहार करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्येकडे विद्यापीठांनी संवेदनशीलतेने पहावे,असे राज्यपालांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी २०० विद्यार्थ्यांना एका विषयात चुकून शून्य गुण मिळाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. अशा चुका टाळल्या पाहिजे व चूक झाल्यास विद्यार्थ्यांना त्वरित दिलासा दिला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी २०२३-२४ शैक्षणिक सत्रापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात विद्यापीठांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तसेच विद्यापीठांशी निगडित सामायिक विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याच विषयावर राज्यातील उर्वरित विद्यापीठांची दुसरी बैठक नागपूर येथे घेणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले. 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2