खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन; तेजस्वी तारा निखळला
नारळीकर केंब्रीज विद्यापीठातून शिक्षण घेतल्यावर ते भारतात परतले. आधी टाटा मुलभूत संशोधन संस्थेत त्यांनी काम केले. त्यानंतर आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. २०२१ मध्ये नाशिक येथे झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
आधुनिक खगोल शास्त्रज्ञ (Modern astronomers) म्हणून ख्याती असलेल्या जयंत नारळीकर (Jayant Narlikar passes away) यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन (Died at home in Pune) झाले. वयाच्या ८६ व्या वर्ष त्यांनी जगाचा निरोप घेतला. जयंत नारळीकर रसाळ भाषेत मराठी विज्ञानकथा लिहण्यासाठी देखील लोकप्रिय होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. नारळीकर झोपेतच अनंतात विलीन झाले.
दोनच वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी आणि गणितज्ज्ञ मंगला नारळीकर यांचे निधन झाले. नारळीकर केंब्रीज विद्यापीठातून शिक्षण घेतल्यावर ते भारतात परतले. आधी टाटा मुलभूत संशोधन संस्थेत त्यांनी काम केले. त्यानंतर आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. २०२१ मध्ये नाशिक येथे झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
- नारळीकर यांनी लिहिलेली वैज्ञानिक आणि इतर साहित्य संपदा
डॉ. जयंत नारळीकर हे लेखक आणि विज्ञानप्रसारकही होते. त्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेतून अनेक विज्ञानकथा, लघुनिबंध, पुस्तके अशा विपुल साहित्य संपदा लिहिली. अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, गणितातील गमतीजमती, नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर), नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान, विश्वाची रचना, विज्ञान आणि वैज्ञानिक, विज्ञानगंगेची अवखळ वळणे, विज्ञानाची गरुडझेप, विज्ञानाचे रचयिते, सूर्याचा प्रकोप, चार नगरांतले माझे विश्व (आत्मचरित्र) इत्यादी साहित्य त्यांनी लिहिले आहे. त्याचबरोबर अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाइम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस यावर देखील त्यांनी लेखन केले आहे.
- नारळीकर यांना मिळालेले पुरस्कार
जयंत नारळीकर यांना त्यांच्या योगदानाबद्दल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. यामध्ये १९६५ मध्ये जयंत नारळीकर यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. २००४ मध्ये जयंत नारळीकर यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तसेच २०१० मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने जयंत नारळीकर यांना गौरवण्यात आले होते. या महत्त्वाच्या पुरस्कारांसह अन्य काही पुरस्कार मिळाले आहेत. स्मिथ पुरस्कार (१९६२), अॅडम्स पुरस्कार (१९६७), शांतीस्वरूप पुरस्कार (१९७९), इंदिरा गांधी पुरस्कार (१९९०) आणि (१९९६) मध्ये कलिंग पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांनी जयंत नारळीकर यांना सन्मानित करण्यात आले होते.