विजयादशमीला विद्यार्थी एकजूटीचा 'विजय'; अखेर कमवा व शिका योजनेच्या मानधनात वाढ 

विजयादशमीला विद्यार्थी एकजूटीचा 'विजय'; अखेर कमवा व शिका योजनेच्या मानधनात वाढ 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ( Savitribai Phule Pune University) राबविल्या जात असलेल्या कमवा व शिका योजनेच्या (Earn and Learn Scheme) मानधनात वाढ करण्याची मागणी अखेर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेकडून (University Management Council) मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या मागणीसाठी एकजूट दाखवत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विजय झाला आहे.विद्यापीठाच्या आजी-माजी आधिसभा सदस्यांनी (C-NET Member) सुध्दा विद्यापीठ प्रशासनाकडे याबाबत पाठ पुरावा केला होता.तसेच अधिसभेने शिफारस केलेली असताना विद्यापीठ प्रशासन त्यावर कोणताही सकारात्मक निर्णय घेत नसल्याचे वृत्त सर्व प्रथम 'एज्युवार्ता'ने प्रसिद्ध केले होते.

हेही वाचा : विद्यापीठातील मुलीची छेड काढणाऱ्याची धिंड काढा ; रोहित पवार आक्रमक, विद्यार्थ्यांशी साधला संवाद

कमवा व शिका योजनेच्या मानधनात वाढ करावी,अशी मागणी अधिसभा सदस्य दादाभाऊ शिनलकर यांनी मागील अधिसभेच्या बैठकीत केली होती.मात्र, विद्यापीठ प्रशासनाकडून त्यावर कोणत्याही हालचाली होत नसल्याने नाराजी व्यक्त करत, आंदोलनाची भूमिका घेतली होती.राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही विद्यार्थ्यांनी याबाबत निवेदन दिले होते.त्याचाप्रमाणे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी सुध्दा कमवा व शिका योजनेच्या मानधनात वाढ करण्याची मागणी सोशल मीडिया वरून व विद्यापीठाकडे पत्रव्यवहार करून केली होती.विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने सुध्दा मानधन वाढीची मागणी लावून धरली होती.अखेर त्याला यश आले आहे.

विद्यार्थ्यांना सध्या प्रति तास ४५ रुपये मानधन दिले जाते.मात्र,वाढत्या महागाईचा विचार करता प्रति तास ६० रुपये वाढ करावी, अशी मागणी केली जात होती. मात्र, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यार्थ्यांच्या मानधनात प्रति तास ५५ रुपये एवढी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.विद्यार्थ्यांना ४५ रुपयांनी एका दिवसाला तीन तासांचे १३५ रुपये मिळत होते.आता ५५ रुपये मानधन झाल्याने एका दिवसाला १६५ मिळणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. 
----------------------------------------

 " विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेऊन विद्यापीठकडून नेहमीच त्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातात .अधिसभा सदस्य व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार कमवा व शिका योजनेत वाढ करण्यात आली आहे.नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत कमवा व शिका योजनेचे मानधन प्रति तास ५५ रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन  प्रामाणिकपणे काम करावे.तसेच कामाबरोबरच आपल्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष द्यावे." 
- डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 
----------------------

"आर्थिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना अडचणी येतात.त्यासाठीच विद्यापीठाने कमवा व शिका योजना सुरू केली आहे.मानधन वाढीबाबत विद्यापीठ प्रशासन सकारात्मक होते.व्यवस्थापन परिषदेने विद्यार्थी हिताचा विचार करून एकमताने प्रतितास ५५ रुपये मानधन वाढीचा निर्णय घेतला आहे." 
- डॉ. डी. बी. पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ