सिंहगड इन्स्टिट्यूटचे मारुती नवले यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

तब्बल ११६ कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा अपहार केल्याचा ठपका ठेवत अपहार व फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. ऑक्टोबर २०१९ ते जून २०२२ या कालावधीत भविष्य निर्वाह निधीच्या रक्कमेत गैरव्यवहार केल्याचे आढळून आले आहे.

सिंहगड इन्स्टिट्यूटचे मारुती नवले यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुण्यातील नामांकित शिक्षण संस्था म्हणून सिंहगड इन्स्टिट्यूटला ओळखले जाते. मात्र, याच सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती निवृत्ती नवले यांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये अपहार व फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर कोंढवा येथील टिळेकर नगर मधील  सिंहगड सिटी स्कूलच्या तब्बल ११६ कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

 भविष्य निर्वाह निधी विभागात अधिकारी राहुल एकनाथ कोकाटे (वय ५१, रा. क्रिमसन क्रिस्ट सोसायटी, हडपसर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. नवले हे सिंहगड सिटी स्कूल चे संस्थापक आहेत. या शाळेतील साधारण ११६ कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ऑक्टोबर २०१९ ते जून २०२२ पर्यंत भविष्य निर्वाह निधीची कपात करण्यात आली. एकूण ७४ लाख ६८ हजार ६३६ रुपयांये कपात केली . परंतु, यातील फक्त ३ लाख ७५ हजार ७७४ रुपयांचीच रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्यात आली. उर्वरित ७० लाख ९२ हजार ८६२ रुपये भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून कर्मचाऱ्यांची फसवणूक केली. याप्रकरणी न्यायालयामध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावरून कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO